भारत अमेरिकेचा महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार देश

अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांचा दावा

बंगळुरू – ज्याची जागा दुसरा कुणीही घेऊ शकत नाही असा भारत हा अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा भागीदार देश ठरतो, असा दावा अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी केला. ‘जी२०’ देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आलेल्या जेनेट येलेन यांनी भारत व अमेरिकेच्या व्यापारी भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करून दोन्ही देशांच्या जनतेचा परस्परांशी संवाद व सहकार्य अगदी दैनंदिन पातळीवर सुरू असते, याचे दाखलेही दिले.

India is an important trading partner२०२१ सालात भारत व अमेरिकेतील व्यापार १५० अब्ज डॉलर्सवर गेला. भारत व अमेरिकेची जनता एकमेकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखावर आहे. हे भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांना अधिक समृद्ध करीत आहेत. भारतीय संवादासाठी वॉट्सॲपचा वापर करतात. तर कित्येक अमेरिकन कंपन्या भारताच्या इन्फोसिसवर अवलंबून आहे, याचा दाखला देऊन येलेन यांनी दैनंदिन पातळीवर भारत व अमेरिकेचे सहकार्य सुरू असते, याकडे लक्ष वेधले.

भविष्याकडे पाहत असताना, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताबरोबरील अमेरिकेचे सहकार्य प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचे आत्तापासूनच दिसू लागले आहे. कुठल्याही संकटाला दाद न देणाऱ्या विश्वासार्ह पुरवठा साखळीसाठी भारत अतिशय महत्त्वाचा देश ठरतो, याची जाणीव अमेरिकेला आहे. भारताबरोबरील अमेरिकेची विश्वासार्ह भागीदारी यासाठी महत्त्वाची ठरेल. ॲपल, गुगल यासारख्या कंपन्यांनी भारतातील आपले उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे, याकडेही जेनेट येलेन यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, एअर इंडिया व बोईंग कंपनीमध्ये झालेल्या करारामुळे अमेरिकेतील दहा लाख जणांना रोजगार मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानले आणि याची दखल साऱ्या जगाने घेतली होती. पुढच्या काळातही अमेरिकेला भारताकडून अशा स्वरुपाच्या सहकार्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये व्यापारी पातळीवर फार मोठे मतभेद देखील आहेत. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी सध्या त्याचा उल्लेख टाळलेला असला, तरी व्यापारविषयक चर्चेत हा मुद्दा सातत्याने समोर येत असल्याचे याआधी उघड झाले होते.

leave a reply