इराण अणुकराराचा भंग करीत असल्याचा जर्मनीचा आरोप

बर्लिन – ‘2015 साली झालेल्या अणुकराराचा इराण पद्धतशीरपणे भंग करीत आहे. इराणने अणुकराराचे उल्लंघन थांबवावे आणि या करारातील जबाबदाऱ्यांचे पूर्णत: पालन करावे’, असा आरोप जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. इराणच्या अणुकरारावर चर्चा करण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये बैठक पार पडण्याआधी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणला फटकारले आहे. जर्मनीची सदर भूमिका म्हणजे इराणबरोबरच्या अणुकराराच्या अंताची सुरुवात असल्याचा दावा युरोपिय माध्यमे करीत आहेत.

अणुकराराचा भंग

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त करणारा अहवाल प्रसिद्ध केला होता. इराणने अणुकरारातील मर्यादा ओलांडून 12 पट अधिक संवर्धित युरेनियमचा साठा जमा केल्याचा इशारा अणुऊर्जा आयोगाने दिला होता. या अहवालाने इराणच्या अणुकराराचे समर्थन करणाऱ्या युरोपिय देशांची झोप उडाली असून जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाचे आलेली प्रतिक्रिया देखील त्याचाच एक भाग असल्याचे दिसते.

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अँड्रीया सॅसे यांनी इराणवर अणुकराराचे पद्धतशीरपणे उल्लंघन करीत असल्याचा ठपका ठेवला. त्याचबरोबर 2015 सालच्या अणुकरारातून वगळलेल्या इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या मुद्दावरही जर्मनी, ब्रिटन व फ्रान्सच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सॅसे म्हणाल्या.

सोमवारी जर्मनी, ब्रिटन व फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीचे तपशील प्रसिद्ध झालेले नाही. पण इराणच्या अणुकार्यक्रमातील घडामोडींवर युरोपिय देश समाधानी नसल्याचे युरोपिय माध्यमांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेची नाराजी पत्करून इराणबरोबरच्या अणुकराराचे समर्थन करणाऱ्या ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीच्या भूमिकेत होत असलेला बदल हा इराणसाठी इशारा असल्याचा दावा युरोपिय माध्यमे करीत आहेत.

leave a reply