तुर्कीला रोखण्यासाठी ग्रीस व ‘युएई’चा धोरणात्मक भागीदारी करार

धोरणात्मक भागीदारीअथेन्स/अबुधाबी – तुर्कीच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवाया रोखण्यासाठी ग्रीसने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात ग्रीसने अमेरिकेसह, फ्रान्स, इस्रायल, इजिप्त व भारताबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यात ‘संयुक्त अरब अमिरात’ची(युएई) भर पडली असून या देशाबरोबर थेट धोरणात्मक भागीदारी व संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ग्रीसच्या परराष्ट्र विभागाने यासंदर्भातील माहिती उघड केली. दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीसने दुसऱ्या देशाबरोबर अशा रितीने करार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा ग्रीसच्या माध्यमांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी ग्रीसचे पंतप्रधान किरिआकोस मित्सोताकिस व परराष्ट्रमंत्री निकोस डेन्डिअस यांनी युएईचा दौरा केला. या दौऱ्यात ग्रीसच्या पंतप्रधानांनी युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर, ग्रीक परराष्ट्रमंत्री डेन्डिअस व युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्लाह बिन झायेद अल नह्यान यांच्यात धोरणात्मक भागीदारी आणि संरक्षण व परराष्ट्रविषयक सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

धोरणात्मक भागीदारीकरारात, एखाद्या देशाच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका निर्माण झाल्यास त्याच्या संरक्षणासाठी दुसऱ्या देशाकडे सहाय्य मागण्याची तरतूद आहे. त्याचवेळी ग्रीस व युएई हे दोन्ही देश आपले लष्कर परस्परांच्या हद्दीत तैनातही करु शकतात. ग्रीसने युएईच्या लष्कराला प्रशिक्षण देण्याचेही मान्य केले आहे. सदर करार कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करण्यासाठी नसल्याचे ग्रीस व युएईने सांगितले असले तरी त्याचा उद्देश तुर्कीला रोखणे हाच असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येतो. ग्रीस व तुर्की हे दोन्ही नाटो सदस्य देश असल्याने त्यातील तरतुदींना धक्का लागणार नाही, याची काळजी ग्रीस व युएईने घेतल्याचेही सांगण्यात येते.

गेल्या काही महिन्यांपासून तुर्कीकडून ग्रीसनजिक भूमध्य सागरी क्षेत्रात आक्रमक हालचाली सुरू आहेत. ग्रीसच्या सागरी हद्दीत असलेली बेटे तसेच इंधनक्षेत्रांवर तुर्कीने हक्क सांगितला असून या भागात आपली जहाजेही पाठविली आहेत. ग्रीसने या कारवायांना जोरदार विरोध केला आहे व आवश्‍यकता भासल्यास संघर्षाचीही तयारी असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर तुर्कीविरोधात आघाडी तयार करण्यासाठीही ग्रीसने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, इजिप्तसह भारताबरोबर सहकार्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेचा ग्रीसमध्ये संरक्षणतळ असून, ग्रीसने त्यांच्याकडून ‘एफ-35’सारखी प्रगत लढाऊ विमाने घेण्याची तयारी दर्शविली आहे. ग्रीस व फ्रान्समध्ये मोठा संरक्षणकरार झाला आहे. या करारानुसार, फ्रान्स ग्रीसला लढाऊ विमाने व विनाशिका पुरविणार आहे. इस्रायल तसेच इजिप्तबरोबर इंधन सहकार्याबाबत करार करण्यात आले आहेत. भारताबरोबर संरक्षण तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता ग्रीस व युएईमधील करार लक्षवेधी ठरतो. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ग्रीस व तुर्कीमधील तणाव चिघळला असता, युएईने आपली ‘एफ-16’ लढाऊ विमाने ग्रीसमधील तळावर तैनात केली होती. ग्रीस व युएईमध्ये संयुक्त सरावही पार पडला होता.

leave a reply