पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर इस्रायलसह जर्मनीची जोरदार टीका

GERMANY-PALESTINIANबर्लिन/जेरूसलेम – आपल्या जर्मनी दौऱ्यात पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्रायलने ५० वेळा पॅलेस्टिनींचा ‘होलोकॉस्ट’ अर्थात वंशसंहार घडविल्याचे आरोप केले आहेत. पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांच्या या वादग्रस्त विधानावर तीव्र पडसाद उमटले आहेत. जर्मन पोलिसांनी अब्बास यांच्या वक्तव्याची चौकशी सुरू केली आहे. तर हिटलरच्या जर्मनीमध्ये ज्यूवंशियांच्या होलोकॉस्ट अर्थात वंशसंहाराबाबत अतिशय तीव्र भावना असलेल्या इस्रायलने अब्बास यांच्या विधानांवर सडकून टीका केली. ज्यूंच्या वंशसंहाराचा अपमान करणाऱ्या अब्बास यांना इतिहास कधीही माफ करणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी म्हटले आहे.

१९७२ साली म्युनिक ऑलिंपिकमध्ये पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने केलेल्या भयंकर हल्ल्यात ११ इस्रायली खेळाडूंचा बळी गेला होता. फताह पक्षाच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडविल्याचे उघड झाले होते. पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास हे याच फताह पक्षाचे अध्यक्ष आहेत. या हल्ल्याला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने जर्मनीची राजधानी बर्लिन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. ५० वर्षापूर्वी फताह पक्षाच्या दहशतवाद्यांनी जर्मनीत इस्रायली खेळाडूंवर केलेल्या हल्ल्याबाबत दिलगिरी व्यक्त करणार का, असा प्रश्न माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांना विचारला.

Prime Minister Yair Lapid यावर प्रतिक्रिया देताना, पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांनी म्युनिक ऑलिंपिकमध्ये झालेल्या हल्ल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याचे टाळून इस्रायलवरच आरोप केले. ‘इस्रायलने ५० पॅलेस्टिनी गावांमध्ये ५० हत्याकांड, ५० कत्तली आणि ५० होलोकॉस्ट (वंशसंहार) घडविले आहेत’, असा गंभीर आरोप अब्बास यांनी केला. ‘होलोकॉस्ट’बाबत इस्रायलमधील तसेच अमेरिका, युरोपमधील ज्यूवंशिय अतिशय संवदेनशील आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने ज्यूवंशियांचा अतिशय अमानुषपणे वंशसंहार घडविला होता. यामध्ये जवळपास ६० लाख ज्यूधर्मियांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. त्यामुळे पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलवर वंशसंहाराचा आरोप केल्यामुळे ज्यूवंशिय तसेच इस्रायल सरकार भडकले आहे.

जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्या उपस्थितीत पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलवर हे आरोप केले. शोल्झ यांनी त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष अब्बास यांना का हटकले नाही, असा सवाल जर्मन जनता विचारीत आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांवर ताशेरे ओढले. ‘जर्मनीत उभे राहून अब्बास इस्रायलवर वंशसंहाराचे आरोप करीत आहेत, हा इस्रायलचा अपमानच नाही तर विनाशकारी असत्य आहे’, असे सांगून पंतप्रधान लॅपिड यांनी हिटलरने केलेल्या ज्यूंच्या वंशसंहाराची आठवण करून दिली.
तर वंशसंहाराचे सत्य नाकारणाऱ्या अब्बास यांना इतिहास माफ करणार नसल्याची टीका इतर इस्रायली नेत्यांनी केली आहे.

leave a reply