हक्कानी नेटवर्कने जवाहिरीला आश्रय दिला

zawahiri-haqqaniवॉशिंग्टन – ‘तालिबानमधील हक्कानी नेटवर्कच्या वरिष्ठ नेत्यांनी अल कायदाचा प्रमुख अयमन अल-जवाहिरीला काबुलमध्ये आश्रय दिला. यावरुन हक्कानी नेटवर्क आणि अल कायदा यांच्यात संबंध होते, हे उघड होत आहे’, असा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केला. जवाहिरी काबुलमध्ये ठार झाल्यामुळे तालिबान आणि अल कायदामधील सहकार्य उघड झाले असून तालिबानने अमेरिकेबरोबरील कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला. यामुळे अमेरिकेने गोठविलेला अफगाणिस्तानचा अब्जावधी डॉलर्सचा निधी परत मिळणार नसल्याचे कारण प्राईस यांनी दिले आहे.

साधारण तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने काबुलमध्ये चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख जवाहिरीला ठार केले. यानंतर तालिबानने अमेरिकेवर दोहा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. पण तालिबानमधील प्रभावशाली हक्कानी नेटवर्कच्या ताब्यात असलेल्या इमारतीत जवाहिरीला ठेवले होते व याच इमारतीवर हल्ला चढविल्याची घोषणा अमेरिकेने केली होती. हक्कानी नेटवर्कने अमेरिकेचे हे दावे फेटाळून जवाहिरीबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचा दावा आणला होता.

zawahiri-targeted-homeपण दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जवाहिरीवरील कारवाईची माहिती देताना, हक्कानी नेटवर्कनेच अल कायदाच्या प्रमुखाला आश्रय दिल्याचा पुनरुच्चार केला. ‘हक्कानी तालिबान नेटवर्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवाहिरीला काबुलमध्ये आश्रय दिला होता आणि जाणुनबुजून ही माहिती लपवून ठेवली होती’, असा ठपका अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी ठेवला. जवाहिरीला आश्रय देऊन हक्कानी तालिबान नेटवर्कने दोहा कराराचे उल्लंघन केल्याचे प्राईस म्हणाले.

गेल्या वर्षी कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या करारानुसार, अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करणाऱ्या तालिबानने अल कायदा व इतर दहशतवादी संघटनांबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नये, असे ठरले होते. त्यामुळे जवाहिरी काबुलमध्ये सापडल्यामुळे तालिबानने दोहा करार पायदळी तुडवल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. हेच कारण देऊन प्राईस यांनी गेले वर्षभर अफगाणिस्तानचा गोठविलेला साडे नऊ अब्ज डॉलर्सचा निधी मोकळा करण्यास नकार दिला. तसेच तालिबानच्या राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार नसल्याची तरतूद बायडेन प्रशासनाने केल्याचे दावे आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

दरम्यान, जवाहिरीच्या ठावठिकाण्याची माहिती पाकिस्तानने अमेरिकेला पुरविली. तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी अमेरिकेला ड्रोन हल्ल्यासाठी हवाईहद्द मोकळी करून दिल्याचे दावे केले जातात. जवाहिरीवरील कारवाईद्वारे जनरल बाजवा अमेरिकेबरोबरचे ताणलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण यामुळे तालिबानमध्ये पाकिस्तानविरोधातील तेढ अधिकच वाढली असून जवाहिरीवरील ड्रोन हल्ल्याचे पडसाद पाकिस्तानात उमटू शकतात, असा इशारा पाकिस्तानी पत्रकार देत आहेत. आत्तापर्यंत पाकिस्तानच्या लष्कराशी संलग्न असलेली हक्कानी नेटवर्क हा गट देखील पाकिस्तानच्या विरोधात जाऊ शकते, अशी भीती हे पत्रकार व्यक्त करीत आहेत.

leave a reply