युक्रेन युद्धामुळे इंधनटंचाईला सामोरे जाणाऱ्या जर्मनीचे सौदी-युएईसह इंधन सहकार्यासाठी प्रयत्न

बर्लिन – रशियाने इंधनाचा पुरवठा खंडीत केल्यामुळे अडचणीत सापडलेली जर्मनी आर्थिक मंदीच्या जवळ पोहोचत असल्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे रशियन इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जर्मनीने इंधनसंपन्न अरब देशांबरोबर सहकार्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या आठवड्यात जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी तातडीचा अरब देशांचा दौरा केला. यावेळी शोल्झ यांनी युएईबरोबर महत्त्वाचा इंधन करार केला, तर सौदीसह इंधनाच्या सहकार्याबाबत चर्चा केली होती.

दोन दिवसांपूर्वी जर्मन चॅन्सेलर शोल्झ यांनी सौदी अरेबियापासून आपल्या आखाती देशांच्या दौऱ्याची सुरुवात केली. जर्मनीवरील वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर शोल्झ यांचा हा दौरा बेतलेला होता, असे जर्मन सरकारने जाहीर केले. त्याप्रमाणे शोल्झ यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. यावेळी उभय देशांमधील संबंध आणि सहकार्यावर चर्चा पार पडल्याची माहिती जर्मनीच्या सरकारने दिली. सौदीबरोबर इंधनविषयक सहकार्य पार पडला नसला तरी येत्या काळात याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जर्मनीने स्पष्ट केले.

यानंतर चॅन्सेलर शोल्झ यांनी युएईचा दौरा करून राजे शेख मोहम्मद बिन झाएद अल-नह्यान यांची भेट घेतली. या भेटीतच जर्मनी आणि युएईमध्ये इंधनविषयक सहकार्य करार पार पडल्याची शोल्झ यांच्या सरकारने जाहीर केले. यानुसार युएई जर्मन कंपनी ‘आरडब्ल्यूई’ला या वर्षअखेरीपर्यंत एक लाख 37 हजार क्युबिक मीटर नैसर्गिक इंधनाचा पुरवठा करणार आहे. रशियाकडून मिळणाऱ्या इंधनाच्या तुलनेत युएईचे इंधन सहकार्य फारच मर्यादित असल्याचा दावा केला जातो. पण यामुळे जर्मनीवरील इंधनाचे संकट काही प्रमाणात कमी होईल आणि जर्मन अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अवधी मिळेल, असा दावा जर्मन सरकार करीत आहे.

युरोपचे इंजिन मानले जाणाऱ्या जर्मनीची अर्थव्यवस्था रशियाकडून येणाऱ्या 56 अब्ज क्युबिक मीटर नैसर्गिक इंधनावर अवलंबून होती. पण गेल्या सहा महिन्यांपासून युक्रेनमध्ये संघर्ष पेटल्यानंतर रशियाकडून युरोपिय देशांना मिळणारा इंधन पुरवठा खंडीत झाला आहे. अशा परिस्थितीत शोल्झ यांनी सौदी, युएई व त्यानंतर कतारचा दौरा करून इंधन सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे इंधनावर आधारीत जर्मनीची अर्थव्यवस्था रुळावर येईल, असे जर्मनीच्या सरकारचे म्हणणे आहे.

दरम्यान, सौदी, युएई व कतारचा दौरा करून शोल्झ यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या देशांना क्लिनचिट दिल्याची टीका जर्मनीमध्ये होत आहे. पण चॅन्सेलर शोल्झ यांनी सौदीच्या दौऱ्यात पत्रकार जमाल खशोगी हत्याप्रकरणावर चर्चा केली. तर युएईने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या धोरणांमध्ये सुधारणा केल्याचे सांगून जर्मन सरकार शोल्झ यांच्या या दौऱ्याचे समर्थन करीत आहेत.

leave a reply