ॲबे शिंजो यांना अखेरचा निरोप देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानसाठी रवाना

नवी दिल्ली – जपानचे माजी पंतप्रधान व भारताचे निकटतम मित्र अशी ख्याती असलेल्या ॲबे शिंजो यांचे अंतिम विधी मंगळवारी पार पडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲबे शिंजो यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंतिम विधीत सहभागी होणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.

वीसहून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख व शंभरहून अधिक देशांचे प्रतिनिधी शिंजो ॲबे यांच्या अंतिम विधीसाठी जपानमध्ये येणार आहेत. 8 जुलै रोजी जपानच्या नारा शहरात एका माथेफिरूने शिंजो ॲबे यांना गोळ्या झाडून ठार केले होते. याच्या काही महिने आधी ॲबे शिंजो यांनी जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. तरीही ते राजकीय पातळीवर सक्रीय होते. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. अत्यंत प्रभावी नेते असलेल्या ॲबे शिंजो यांच्याकडे भारताचे निकटतम मित्र म्हणून पाहिले जात होते.

ॲबे यांच्या कार्यकाळात भारत व जपानचे सहकार्य नव्या उंचीवर पोहोचले होते. हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर क्षेत्राचा एकत्रितपणे विचार करून इंडो-पॅसिफिकची संकल्पना मांडणारे ॲबे हे पहिले मोठे नेते होते. 2007 साली भारताच्या संसदेला संबोधित करताना ॲबे यांनी भारत व जपानच्या धोरणात्मक सहकार्याचा आराखडा मांडला होता. भारताचे महत्त्व फार आधीच लक्षात आलेल्या काही मोजक्या द्रष्ट्या नेत्यांमध्ये ॲबे यांचा समावेश केला जातो.

चीनच्या वर्चस्ववादी कारवाया वाढत असताना, जपानला आपले पारंपरिक बचावात्मक संरक्षणविषयक धोरण बदलावेच लागेल, अशी आग्रही भूमिका ॲबे शिंजो यांनी स्वीकारली होती. यासाठी संरक्षणखर्चात वाढ करण्याबरोबरच चीनला शह देण्यासाठी प्रतिस्पर्धी देशांबरोबरील सहकार्य वाढवित नेण्याची व्यूहरचना ॲबे शिंजो यांनी आखली होती. त्याचा फार मोठा लाभ जपानला मिळत आहे. मात्र चीन यामुळे ॲबे यांच्या नेतृत्त्वावर कायम चिखलफेक करीत राहिला. पंतप्रधानपदावर नसताना देखील ॲबे यांनी तैवानबाबत चीनने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे जपानलाही धोका संभवतो, याची परखड शब्दात जाणीव करून दिली होती. तसेच तैवानच्या संरक्षणाबाबत धरसोडीचे धोरण स्वीकारणाऱ्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला ॲबे यांनी चांगलेच फटकारले होते.

भारताशी सहकार्य वाढविण्याचे धोरण स्वीकारून विधायक भूमिका स्वीकारणारा लोकशाहीवादी देश म्हणून शिंजो ॲबे यांनी कायम भारताचा आदरच केला. भारत सरकारने गेल्या वर्षी पद्मविभूषण हा नागरी सन्मान देऊन ॲबे शिंजो यांना सन्मानित केले होते. अशा नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी जपानला भेट देत आहेत. याद्वारे ॲबे शिंजो यांच्याबद्दल भारताला वाटत असलेला आदर व भारताच्या संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

leave a reply