इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील जर्मनीच्या लष्करी हालचाली कटू स्मृतींना उजाळा देणाऱ्या

-चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची शेरेबाजी

बीजिंग/बर्लिन – इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांबरोबरील सहकार्य वाढवून, सागरी वाहतुकीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जर्मनीने या क्षेत्रात विनाशिकांचे पथक तैनात करणार असल्याचे जाहीर केले. जर्मनीने केलेल्या या घोषणेवर चीनने संताप व्यक्त केला आहे. ‘या तैनातीमुळे इतिहासातील कटू स्मृतींना उजाळा मिळेल आणि वाईट गट पुन्हा एकत्र येतील’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. याद्वारे चीन जर्मनीच्या नाझीवादी इतिहासाची आठवण करून देत असल्याचे दिसत आहे.

Eberhard Zornगेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये मित्रदेशांचा ‘पिच ब्लॅक’ युद्धसराव सुरू आहे. यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियासह भारत, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला आहे. या सरावात जर्मनीने 13 लढाऊ विमाने रवाना केल्याची माहिती समोर आली होती. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी अमेरिका व मित्रदेशांचा हा हवाई सराव सुरू असल्याचा दावा केला जातो. ऑस्ट्रेलियातील या सरावावर चीनने याआधीच टीका केली होती.

अशा परिस्थितीत, जर्मनीचे संरक्षणदलप्रमुख जनरल एबरहार्ड झॉर्न यांनी दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची घोषणा केली. गेल्या वर्षी जर्मनीच्या एका विनाशिकेने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून प्रवास केला होता. यावर्षी जर्मनीची 13 लढाऊ विमाने या क्षेत्रातील हवाई सरावात सहभागी झाली आहेत. पुढच्या वर्षी आणि 2024 साली जर्मनीच्या विनाशिकांचा मोठा ताफा इंडो-पॅसिफिकमधील तैनातीसाठी दाखल होईल, असे जनरल झॉर्न यांनी जाहीर केले. या क्षेत्रातील जर्मनीचा प्रभाव वाढविण्यासाठी ही तैनाती केली जाणार असल्याची माहिती जर्मनीच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिली.

wang wenbin‘विनाशिकांच्या या तैनातीद्वारे जर्मनीला कुठल्याही देशाला कोणताही चिथावणी द्यायची नाही. पण जर्मनी आपल्या सहकाऱ्यांच्या पाठिशी आणि आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारीत सागरी स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी नेहमीच उभा असेल, हा संदेश द्यायचा आहे’, असे सांगून जनरल झॉर्न यांनी या तैनातीचे समर्थन केले. जर्मन संरक्षणदलप्रमुखांच्या या घोषणेमुळे चीनची बेचैनी वाढली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात तैनाती वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जर्मनीवर शेरेबाजी केली आहे.

तसेच ‘जर्मनीच्या या तैनातीमुळे इतिहासातील कटू आठवणींना उजाळा मिळेल आणि काही देशांमध्ये वाईट संघटना तयार होतील’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी बजावले. चीनचे संरक्षण धोरण बचावात्मक व आपल्या क्षेत्रीय हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी असल्याचा दावा वेन्बिन यांनी केला.

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नेतृत्त्वाखालील नाझी जर्मनीने साम्राज्यविस्तारासाठी आक्रमक धोरण स्वीकारले होते. त्यावेळी हिटलरच्या विनाशिकांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रापर्यंत धडक मारली होती. तसेच हिटलरच्या या विस्तारवादाला त्यावेळी जपानने देखील साथ दिली होती, याकडे चिनी माध्यमे लक्ष वेधत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्बंध लादण्यात आलेल्या जर्मनीने आपल्या लष्करी हालचाली मर्यादित ठेवल्या होत्या. पण इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तैनाती वाढवून जर्मनी पुन्हा एकदा त्या कटू स्मृतींना नव्याने उजाळा देत असल्याचे चीन सुचवित आहे. याद्वारे चीनचे परराष्ट्र मंत्रालय जर्मनीवर साम्राज्यविस्ताराचा आरोप करीत असला तरी प्रत्यक्षात चीनचे धोरणच दुसऱ्या महायुद्धातील साम्राज्यवादी शक्तींचे अनुकरण करणारे असल्याचे आरोप होत आहेत.

leave a reply