तैवानला अमेरिका पुरवित असलेल्या शस्त्रास्त्रांमुळे चीन अधिकच बिथरला

US is supplying to Taiwanबीजिंग/वॉशिंग्टन – चीनच्या आक्रमणाच्या गडद छायेखाली असलेल्या तैवानसाठी अमेरिकेने सुमारे १.१ अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केली होती. त्यावर चीनने आगपाखड सुरू केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय ‘वन चायना’ धोरणाचे उल्लंघन असून याचा द्विपक्षीय संबंधांवर विपरित परिणाम होईल, अशी धमकी चीनने दिली आहे. इतकेच नाही तर अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात चीन आवश्यक असलेली पावले उचलल्यावाचून राहणार नाही, असा इशाराही चीनने दिला आहे.

अमेरिकेने तैवानला ३५.५ कोटी डॉलर्सची हवेतून सागरी क्षेत्रात मारा करणारी हार्पून क्षेपणास्त्रे, साडेआठ कोटी डॉलर्स इतक्या रक्कमेची हवेतून हवेत मारा करणारी साईडविंडर क्षेपणास्त्रे तसेच हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारी अद्ययावत रडारयंत्रणा पुरविण्याची घोषणा केली होती. याबरोबरच तैवानच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचाही अमेरिकेच्या सहाय्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य तैवानच्या स्वसंरक्षणाची क्षमता वाढविल. मात्र यामुळे अमेरिकेने मान्य केलेल्या ‘वन चायना पॉलिसी’चे उल्लंघन होत नाही. हा शस्त्रपुरवठा अमेरिकेच्या धोरणाला अनुसरून आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

bidenयाबरोबरच चीनने तैवानवरील लष्करी, राजनैतिक आणि आर्थिक दबाव टाकण्याचे धोरण सोडून तैवानशी चर्चा करावी, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. पण अमेरिकेचे हे दावे चीनने फेटाळले असून तैवानला शस्त्रे पुरवून अमेरिका चीनबरोबरील संबंधांवर घाव घालत असल्याची जोरदार टीका केली. इतकेच नाही तर पुढच्या काळात अमेरिकेच्या या निर्णयाचे गंभीर परिणाम होतील, असे चीनने धमकावले आहे. अमेरिकेच्या सदर निर्णयाविरोधात चीन आवश्यक ती पावले उचलल्यावाचून राहणार नाही, असा इशारा अमेरिकेतील चीनचे राजदूत लियू पेंगयू यांनी दिला आहे.

jinpingअमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने तैवानच्या आखातात आक्रमक कारवाया सुरू केल्या होत्या. पेलोसी यांची ही भेट तैवानसह अमेरिकेसाठीही भयंकर परिणाम घडविणारी असेल, असा संदेश देण्यासाठी चीनच्या या लष्करी कारवाया सुरू आहेत. यामध्ये तैवानच्या हवाई व सागरी हद्दीत चीनच्या लढाऊ विमाने व युद्धनौकांच्या घुसखोरीचा समावेश आहे. यामुळे तैवानच्या आखातातील वातावरण तापले असून तैवानच्या रक्षणासाठी अमेरिकेबरोबरच युरोपिय देशांनाही कठोर भूमिका स्वीकारावी लागली. यानंतर अमेरिकेचे आणखी काही सिनेटर्स तैवानच्या दौऱ्यावर गेले असून युरोपिय महासंघाचे प्रतिनिधीही त्यांचे अनुकरण करीत आहे. या साऱ्याचा निषेध नोंदविण्यासाठी चीनने आपल्या आक्रमकतेत वाढ केली खरी. पण आता या आक्रमक लष्करी हालचाली चीनवरच उलटल्याचे दिसू लागले आहे. कारण तैवानला चीनपासून असलेला धोका वाढल्याचे दिसू लागल्यानंतर, बायडेन प्रशासनावर तैवानला अधिक शस्त्रसज्ज करण्यासाठी दडपण आले. यामुळे युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर, तैवानच्या मागणीनुसार शस्त्रास्त्रे पुरविण्यास नकार देणाऱ्या बायडेन प्रशासनाला तैवानसाठी सुमारे १.१ अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रे पुरविण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे. यामुळे चीनचे लष्करी डावपेच या देशावरच उलटले असून पुढच्या काळात चीनला तैवानच्या विरोधात हालचाली करणे अधिक महाग पडू शकते.

तैवानवर चीनचा हल्ला म्हणजे थेट अमेरिकेला लष्करी आव्हान देण्यासारखे ठरते. सध्या तरी चीन ही जोखीम पत्करणार नाही, असे काही विश्लेषक सांगत आहेत. मात्र तैवानने चीनच्या विरोधात स्वीकारलेल्या धोरणांमुळे, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे आसन अस्थीर झाले आहे. त्यामुळे ते आपले आसन स्थिर करण्यासाठी, परिणामांकडे दुर्लक्ष करून तैवानवर हल्ल्याचे आदेश देऊ शकतात, असे चीनविषयक तज्ज्ञ बजावत आहेत.

अशा परिस्थितीत, अमेरिकेने तैवानसाठी शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा पुरवठा करून चीनला अधिकच अस्वस्थ केले आहे. अमेरिकेच्या या सहाय्यामुळे चीनची लढाऊ विमाने व युद्धनौका तसेच पाणबुड्यांना लक्ष्य करण्याची तैवानची क्षमता अधिकच वाढणार असून याचा फार मोठा फटका चीनला बसू शकतो. यामुळेच चीनची बेचैनी वाढत चालल्याचे दिसत आहे.

leave a reply