रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेची विभागणी होईल

- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा दावा

रशिया-युक्रेनवॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे भूराजकीय पातळीवरील गटांमध्ये विभाजन होईल, असा दावा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या नव्या अहवालात केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकताच ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’चा दुसरा तिमाही अहवाल सादर केला. त्यात पुढील काही वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या धोक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेच्या संभाव्य विभागणीची जाणीव करून दिली.

आपल्या अहवालात नाणेनिधीने जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य अधिक गडद व अनिश्चित बनल्याचे भाकित वर्तविले आहे. ‘रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे विविध भूराजकीय गटांमध्ये विभाजन होण्याचा गंभीर धोका आहे. या गटांमध्ये तंत्रज्ञानाचे निकष वेगळे असतील. तसेच परस्परांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी असणारी यंत्रणा तसेच राखीव चलनेही वेगवेगळी असू शकतात. अशा विभागणीमुळे आंतरराष्ट्रीय समुदाय पुढील काळात महत्त्वाच्या जागतिक समस्यांवर एकत्रित तोडगा काढू शकणार नाही’, असे नाणेनिधीने अहवालात बजावले.

रशिया-युक्रेनजागतिक अर्थव्यवस्थेचे विभाजन झाल्यामुळे हवामानबदलासारख्या समस्येवर सर्वपक्षीय सहकार्य शक्य होणार नाही व त्यामुळे सध्या निर्माण झालेले अन्नटंचाईचे संकट अधिकच भयावह होईल, असा इशाराही नाणेनिधीने दिला. रशिया-युक्रेन युद्धामुळे आर्थिक तसेच व्यापारी क्षेत्राला असणाऱ्या धोक्यांची तीव्रताही वाढल्याचे नाणेनिधीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. नाणेनिधीकडून जागतिक अर्थव्यवस्थेच्या विभाजनाच्या धोक्याकडे लक्ष वेधण्याची ही दुसरी वेळ आहे.

काही महिन्यांपूर्वी नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिवा यांनी याबाबत वक्तव्य केले होते. जगातील देश विविध भूराजकीय गटांमध्ये विभागले जाण्याची भीती वाढली आहे, असे जॉर्जिवा यांनी बजावले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही, युक्रेन संघर्षानंतरची जागतिक व्यवस्था पूर्वीप्रमाणे राहणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. तर जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनीही रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला धक्का बसल्याचे म्हटले होते.

leave a reply