एससीओच्या बैठकीत पाकिस्तानची घोर निराशा

एससीओच्या बैठकीतइस्लामाबाद – उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे पार पडलेल्या एससीओच्या बैठकीत पाकिस्तानच्या वाट्याला दारूण निराशा आली. या बैठकीत सहभागी झालेले पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे दावे करण्यात येत होते. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री रशियन परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ही चर्चा रद्द केल्याने, आपल्या देशाचा अपमान झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. भारताने रशियाबरोबरील आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा वापर करून पाकिस्तानबरोबरील ही चर्चा रद्द केल्याचे आरोप पाकिस्तानचे विश्लेषक करीत आहेत.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाळात बुडालेली असताना, एकही मित्रदेश पाकिस्तानच्या सहाय्याला आलेला नाही, अशी खंत या देशाकडून व्यक्त करण्यात येत आहे. चुकीचे परराष्ट्र धोरण हे त्याचे प्रमुख कारण असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र नाही. कधी अमेरिका तर कधी चीनवर अवलंबून पाकिस्तान आपले धोरण आखत आला आहे. याचे अतोनात नुकसान देशाला सहन करावे लागत असून आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकही मित्रदेश राहिलेला नाही, अशी टीका माध्यमे करीत आहेत. त्याचवेळी भारताच्या परराष्ट्र धोरणाची पाकिस्तानात प्रशंसा केली जात आहे.

अमेरिकेबरोबरील सहकार्य कायम ठेवून भारत रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहे. आपल्या देशहितासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याची भारत जी धमक दाखवतो, ते पाकिस्तानला शक्य नाही. याचे कारण पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या दुबळा आहे, अशी खंत या देशातील पत्रकार व्यक्त करीत आहे. ही चूक सुधारण्यासाठी पाकिस्तानने केवळ अमेरिका व चीन या दोनच देशांचा विचार न करता रशिया तसेच इतर देशांबरोबरील संबंध वाढवावे, असे सल्ले काही विश्लेषकांनी आपल्या सरकारला दिले हेोते. विशेषतः रशियाकडून सवलतीच्या दरात इंधनाची खरेदी केली व अब्जावधी डॉलर्सची बचत केली, याकडे पाकिस्तानी माध्यमांनी लक्ष वेधले होते.

यानुसार उझबेकिस्तानमधील एससीओच्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो रशियाचे पररराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याच्या बातम्याआल्या होत्या. या चर्चेमधून पाकिस्तानला फार मोठ्या अपेक्षा असल्याचे संकेत मिळू लागले होते. पण रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही चर्चा रद्द केली आणि पाकिस्तानचा हिरमोड झाला आहे. यामागे भारताचे कारस्थान असावे, असा ठपका पाकिस्तानातील काही भारतद्वेष्ट्यांनी ठेवला आहे.

रशियाबरोरील आपल्या मैत्रीचा वापर करून पाकिस्तानल असा धक्का देणे भारतासाठी अवघड नाही, असे या भारतद्वेष्ट्यांचे म्हणणे आहे. तर पाकिस्तानच्या माध्यमांचा दुसरा गट ताश्कंदमध्ये भारताच्या परराष्ट्रंमत्र्यांनी पाकिस्तानचे नवे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्याशी चर्चा केली नाही, म्हणून नाराजी व्यक्त करीत आहेत. तर बिलावल भुत्तो यांनी 2019 साली भारताने काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयामुळे चर्चा शक्यच नसल्याचा दावा करून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी बिलावल भुत्तो यांनीच भारताबरोबर चर्चा करून सहकार्य प्रस्थापित करण्यावाचून पर्याय नसल्याची विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्या भारतविषयक भूमिकेत झालेला हा बदल, चर्चेसाठी भारताकडून न मिळालेल्या प्रतिसादामुळेच झाला असावा, अशी दाट शक्यता समोर येत आहे. मात्र यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडत चालल्याची चर्चा अधिकच जोर पकडू लागली आहे. पुढच्या काळात पाकिस्तान दिवाळखोर बनल्यास काय होईल, यावर आता पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्या चर्चा करू लागल्या आहेत.

leave a reply