जगभरात गव्हासाठी युद्धही भडकू शकते

- रशियन वर्तमानपत्राचा दावा

मॉस्को – जगावर कोसळलेल्या गव्हाच्या संकटासाठी पाश्चिमात्य देश रशियाला जबाबदार धरत आहेत. पण या परिस्थितीसाठी एकटा रशिया कारणीभूत ठरत नाही किंवा रशियाने स्वत:हून हे युद्ध सुरू केलेले नाही. तर पाश्चिमात्य देश देखील सध्याच्या परिस्थितीला तितकेच जबाबदार आहेत व या देशांनी देखील गव्हाचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे लवकरच रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सुटला नाही तर जगभरात गव्हासाठी युद्धही भडकू शकते, असा इशारा रशियन वर्तमानपत्राने दिला.

गव्हासाठी युद्धहीया वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरातील गव्हाच्या किंमतीत वाढ झाली होती. रशिया-युक्रेन युद्धानंतर यात 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे ‘इझेस्टिया’ या रशियन वर्तमानपत्राने म्हटले आहे. जगभरातील गव्हाच्या एकूर्ण निर्यातीपैकी जवळपास 16 टक्के निर्यात एकटा रशिया करतो. तर युक्रेनमधून 10 टक्के निर्यात केली जाते. त्यामुळे युद्धामुळे या दोन्ही देशांकडून गव्हाची निर्यात बंद झाली आहे, याकडे रशियन वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

या युद्धासाठी पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, रशियातील आपली गुंतवणूक मागे घेतली तसेच रशियाबरोबरचे व्यापारी सहकार्य मोडले. पण याचा थेट परिणाम रशियातून निर्यात होणाऱ्या गव्हाच्या किंमतीवर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती वाढू लागल्यानंतर कझाकस्तान आणि भारताने देखील आपल्या देशातून होणारी गव्हाची निर्यात रोखली, असा दावा रशियन वर्तमानपत्राने केला. भारताच्या निर्णयाबरोबर अमेरिकेतील गव्हाच्या किंमतीत वाढ दिसली. तर युरोपमध्ये एक टन गव्हाचे दर 461 डॉलर्सवर या ऐतिहासिक किंमतीवर पोहोचले, असे या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

गव्हासाठी युद्धहीजगभरात निर्माण झालेल्या गव्हाच्या संकटासाठी रशिया जबाबदार असल्याचा पाश्चिमात्यांचा आरोपही या वर्तमानपत्राने फेटाळला. रशिया आणि युक्रेन व्यतिरिक्त अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी हे देश देखील गव्हाचे निर्यातदार आहेत. पण या देशांनी देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील गव्हाच्या किंमती खाली आणण्यासाठी आपल्याकडील गव्हाची निर्यात केली नाही, याची आठवण रशियन वर्तमानपत्राने करुन दिली. पाश्चिमात्य देशांनी गव्हाचा साठा करून याच्या किंमती वाढू दिल्याचा अप्रत्यक्ष आरोप रशियन वर्तमानपत्राने केला.

अशा परिस्थितीत, रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सोडविणे आवश्यक बनले आहे. अन्यथा जगभरात गव्हासाठी युद्ध भडकेल, असे या वर्तमानपत्राने बजावले. तसेच येत्या काळात पाश्चिमात्य देश देखील गहू व इतर अन्नधान्याच्या मोबदल्यात रशियावरील निर्बंध मागे घेऊ शकतात, असा मोठा दावा या वर्तमानपत्राने केला.

leave a reply