कराची स्फोटातील आरोपींना इराणमधून आदेश मिळाले

- पाकिस्तानी यंत्रणांचा आरोप

कराची – आठवड्यापूर्वी पाकिस्तानच्या कराची शहरात झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे इराणशी जोडलेले असल्याचा आरोप पाकिस्तानचा दहशतवादविरोधी विभाग ‘सीटीडी’ने केला. इराणमधील मास्टरमाईंडच्या इशाऱ्यावर हल्लेखोराने कराचीचा स्फोट घडविल्याचे सीटीडीने म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये इराणस्थित ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’ ही बंडखोर संघटना देखील सहभागी असल्याचे पाकिस्तानी यंत्रणांनी स्पष्ट केले. इराणने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळले आहेत. याआधीही इराण आणि पाकिस्तानने आपापल्या देशांमधील दहशतवादी हल्ल्यांसाठी एकमेकांना जबाबदार धरले होते.

कराचीगेल्या महिन्याभरात पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची तीनवेळा दहशतवादी हल्ल्यांनी हादरली. या हल्ल्यांमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा आरोप पाकिस्तानच्या माध्यमांनी केला होता. पण यापैकी पहिल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेने स्वीकारली होती. त्यानंतर 12 मे रोजी कराचीच्या सदार बाजारभागात सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करून हल्ला झाला होता. एकाचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यामागे स्वतंत्र सिंधूदेशची मागणी करणारी बंडखोर संघटना असल्याचा दावा पाकिस्तानी यंत्रणांनी केला होता.

पाकिस्तानचे दहशतवादविरोधी विभाग ‘सीटीडी’ने दिलेल्या माहितीनुसार, सदार बाजारभागातील स्फोटात सहभागी असलेल्या दोघांनाही एन्काऊंटरमध्ये ठार केले. गेल्या आठवड्यात झालेल्या स्फोटाची चौकशी सुरू असताना, मोचाका भागात तिघेजण एका मोटारीवर स्फोटके लादत असल्याचे उघड झाले आहे. त्यांना हटकले असता, तिघांनीही पाकिस्तानी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोघे ठार झाले तर तिसरा फरार झाला.

कराचीसुरक्षा यंत्रणेच्या कारवाईत ठार झालेले डिनो आणि अली हे दोघेही स्वतंत्र सिंधूदेशची मागणी करणाऱ्या ‘सिंधूदेश रिव्होल्युशनरी आर्मी’ या बंडखोर संघटनेचा प्रमुख असघर शहाच्या संपर्कात होते. असघर यानेच डिनो आणि अली यांना इराणमध्ये प्रशिक्षणासाठी रवाना केले होते, अशी माहिती सीटीडीचे प्रमुख मुर्तझा वहाब यांनी दिली. यापैकी डिनो याने स्फोटके बनविण्याचे कौशल्य मिळविले होते.

याआधी 10 ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात रेल्वेलाईनवर स्फोट घडविण्याचे प्रकार डिनोने केले होते. तर हल्ल्यासाठी अतितीव्रतेच्या स्फोटकांचा वापर करण्यासाठी डिनोने 50 हजार रुपये आकारल्याची माहिती सीटीडी’ने दिली. पण सदार भागातील स्फोटासाठी असघर याने डिनोला तब्बल एक लाख, 78 हजार रुपये दिले. डिनोला कराचीत स्फोट घडविण्यासाठी इराणमधूनच आदेश आले होते, असा दावा सीटीडी करीतआहे.

leave a reply