विस्तारवादाचे दिवस संपले – भारताच्या पंतप्रधानांचा चीनला इशारा

लेह – ‘विस्तारवादी शक्तींमुळे मानवतेचा फार मोठा विनाश झाला आहे. मात्र अखेरीस विस्तारवादी शक्तींचा नाश होतो किंवा त्यांना माघार घेणे भाग पडतेच. याची साक्ष इतिहास देत आला आहे’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या भूमीवर हक्क सांगणाऱ्या विस्तारवादी चीनवर मर्मभेदी प्रहार केला. त्याचवेळी गलवान व्हॅलीमध्ये चीनच्या विश्वासघातकी हल्ल्याचा मोठ्या शौर्याने सामना करुन अतुलनीय पराक्रम गाजविणाऱ्या भारतीय सैनिकांची पंतप्रधानांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

विस्तारवादाचे दिवस

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा लडाख दौरा रद्द झाल्याची बातमी आल्यानंतर भारत सीमावादाबाबत काहीशी उदार भूमिका स्वीकारत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र शुक्रवारी पंतप्रधानांनी लेहला भेट देऊन सर्वांनाच फार मोठा धक्का दिला. त्यांचा हा दौरा म्हणजे भारताने चीनला दिलेला निर्णायक इशारा असल्याचे माजी लष्करी अधिकारी, मुत्सद्दी आणि सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनसाठी हा फार मोठा धक्का ठरतो, असे सांगून माजी लष्करी अधिकारी व विश्लेषक या दौऱ्याचे स्वागत करीत आहेत. गलवान व्हॅलीतील संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची पंतप्रधान मोदी यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तुम्ही गाजविलेल्या अतुलनीय शौर्याचा साऱ्या देशाला अभिमान वाटत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तर लडाखमधील निमू इथे तैनात असलेल्या सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तुमच्या पराक्रमाचा दाह शत्रूला जाणवला आहे आणि साऱ्या जगाने त्याची दखल घेतली आहे, असे स्पष्ट केले.

विख्यात कवी रामधारी दिनकर यांच्या काव्यपंक्तीचा यावेळी पंतप्रधानांनी संदर्भ देऊन भारताच्या वीर सैनिकांचा पराक्रम म्हणजे सिंहनादच होता आणि त्याने शत्रूचा थरकाप उडाला, असे अभिमानाने म्हटले आहे. याबरोबरच पंतप्रधानांनी येथे तैनात असलेल्या सैन्यासाठी आवश्यक ते सारे संरक्षण साहित्य व सामुग्री पुरविली जाईल, अशी ग्वाही दिली. कमजोर शांततेसाठी पुढाकार घेऊ शकत नाहीत, हे कार्य वीरच करू शकतात, असे सांगून पंतप्रधानांनी भारताचे पुढील धोरण याच मार्गाने जाणार असल्याचे संकेत दिले. मुरलीधर श्रीकृष्णाचे पूजन करणाऱ्या भारतीयांचा आदर्श चक्रधारी श्रीकृष्ण आहे, याचीही आठवण पंतप्रधानांनी करुन दिली. याद्वारे भारताला गृहित धरु नका, असा सज्जड इशाराच पंतप्रधानांनी चीनला दिला.

भारतमाता आणि देशासाठी बलिदान देण्यासाठी तयारी असलेल्या वीर सुपुत्रांना जन्म देणाऱ्या माता साऱ्या देशाला वंद्य आहेत. तुमचे साहस ज्या उंचीवर तुम्ही तैनात आहात, त्यापेक्षा कितीतरी ऊंच आहे. इथल्या पर्वतांप्रमाणे तुमचा निर्धार अडग आहे, असे सांगून पंतप्रधानांनी सैनिकांचे मनोबल सर्वोच्चकोटीचे असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या दौऱ्याचे फार मोठे पडसाद उमटले आहेत. या दौऱ्यावर चीनची प्रतिक्रिया आली असून आम्हाला विस्तारावादी म्हणणे चुकीचे ठरेल, असे चीनने म्हटले आहे. त्याचवेळी दोन्ही देश तणाव वाढणार नाही अशी भूमिका स्वीकारतील, अशी अपेक्षाही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. यावेळी चीनने सीमावादावरुन भारताला चिथावणी देऊन फार मोठी चूक केली, आपल्या आकस्मिक हल्ल्याला भारताकडून असे मुखभंग करणारे प्रत्युत्तर मिळेल, याचा चीनने विचारही केला नव्हता. त्यामुळे चीनने केलेली आगळिक यावेळी भारतासाठी अतिशय लाभदायी ठरली, कारण यामुळे भारताला उघडपणे चीनच्या विरोधात भूमिका घेता आली, याचे फार मोठे सकारात्मक परिणाम लवकरच पहायला मिळतील, असे मत माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत.

leave a reply