देशात कोरोनाच्या दोन लसींच्या मानवी चाचण्यांना परवानगी

नवी दिल्ली – देशात दर दिवशी कोरोनाचे २० हजाराहून अधिक नवे रुग्ण नोंदविले जात असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. हैदराबादमधील एका फार्मा कंपनीला कोरोनावरील लस तयार करण्यात यश मिळाले असून ७ जुलैपासून मानवी चाचण्यांना या कंपनीला परवानगी मिळाली आहे. या चाचण्या यशस्वी ठरल्या, तर १५ ऑगस्ट रोजी ही कंपनी व ‘आयसीएमआर’ कोरोनावरील नवी लस आणू शकते. तसेच गुजरातमधील आणखी एका कंपनीला लस तयार करण्यात यश मिळाले असून या कंपनीलाही आयसीएमआरने ह्यूमन ट्रायलला परवानगी दिल्याचे वृत्त आहे.

मानवी चाचण्यांना परवानगीदेशात गुरुवारपासून शुक्रवारी सकाळपर्यँत २०,९०३ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ६,२५,५२४ वर पोहोचली. शुक्रवार रात्रीपर्यंत सुमारे २० हजार नवे रुग्ण देशभरात आढळल्याने देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ६ लाख ४५ हजारांजवळ पोहोचली आहे. महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी २४ तासात सहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले. राज्यात एका दिवसात १९८ जणांचा बळी गेला आणि ६,३६४ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २ लाख ९३ हजारांजवळ पोहोचली आहे.

तामिळनाडूतही सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. तसेच ५७ जणांचा बळी गेला. यामुळे तामिळनाडू हे लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळलेले देशातील दुसरे राज्य झाले आहे. तामिळनाडूनंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत चोवीस तासात २,८६४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने या राज्यातील रुग्णांची संख्या ९२ हजारांच्या पुढे गेली आहे. उत्तर प्रदेशात ९७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात आणि तेलंगणात अनुक्रमे १५०० आणि १२०० हून नवे रुग्ण आढळले आहेत.

मानवी चाचण्यांना परवानगी

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच दोन भारतीय औषध कंपन्यांना कोरोनाची लस विकसित करण्यात यश मिळाल्याची बातमी आहे. हैदराबादमधील ‘भारत बायोटेक’ कंपनीने आपल्या चाचण्या यशस्वी ठरल्याच्या दावा केला होता. यासंबधीचा संशोधन अहवाल तपासल्यावर या कंपनीला ह्यूमन ट्रायलची परवानगी देण्यात आली आहे. ७ जुलैपासून या चाचण्या केल्या जाणार असून या चाचण्यात यश मिळाले, तर १५ ऑगस्टआधी देशात ‘कोव्हॅक्सीन’ नावाची ही कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. याशिवाय गुजरातमधील ‘झायडस कॅडिला’ नावाच्या औषध कंपनीलाही कोरोनाची लस तयार करण्यात यश मिळाले आहे. या कंपनीलाही ह्यूमन ट्रायलची परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या सव्वापाच लाखांच्या पुढे गेली आहे. ‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जगभरात या साथीने दगावलेल्यांची संख्या ५,२५,९५८ वर पोहोचली आहे. तसेच जगभरातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी १० लाख ७२ हजार ५९४ वर पोहोचली आहे. गुरुवारी अमेरिकेत २४ तासात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. अमेरिकेत एका दिवसात ५० हजार नवे रुग्ण आढळले.

ब्राझीलमध्येही एका दिवसात ४८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे ब्राझीलमधील रुग्ण संख्या १५ लाखांजवळ पोहोचली असून एकूण बळींची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. रशियातील रुग्ण संख्या ६ लाख ६७ हजारांवर गेली आहे. या देशात चोवीस तासात साडेसहा हजार नवे रुग्ण आढळले. भारतातील वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता भारत कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत दोन दिवसात रशियाला मागे टाकेल असे संकेत मिळत आहेत.

leave a reply