‘स्विफ्ट’ला पर्याय म्हणून उभारलेल्या रशियन यंत्रणेला चांगला प्रतिसाद

- रशियाच्या मध्यवर्ती बँकेचा दावा

‘स्विफ्ट’मॉस्को – आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँॅकिंग व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘स्विफ्ट’ या मध्यवर्ती यंत्रणेला पर्याय म्हणून 2014 साली रशियाने स्वतंत्र यंत्रणा उभारली होती. ‘एसपीएफएस’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या या यंत्रणेला जागतिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या यंत्रणेशी जोडलेल्या एकूण उपक्रमांची संख्या 400वर गेली असून त्यात 12 देशांमधील 100हून अधिक उपक्रमांचा समावेश आहे, असे ॲला बाकिना यांनी सांगितले. बाकिना या रशियाच्या ‘नॅशनल पेमेंट्स सिस्टिम डिपार्टमेंट’च्या प्रमुख आहेत.

‘या वर्षात एसपीएफएसचा वेगान विस्तार होत असल्याचे दिसत आहे. 2022 सालच्या पहिल्या सहा महिन्यात परदेशातील 50 उपक्रम या यंत्रणेशी जोडले गेले आहेत. एसपीएफएसशी जोडलेल्या एकूण उपक्रमांची संख्या 440 झाली आहे. त्यात 12 देशांमधील 100 उपक्रमांचा समावेश आहे. यापूर्वीच्या कालावधीत दरवर्षी सामील होणाऱ्या उपक्रमांपेक्षा गेल्या सहा महिन्यात जोडल्या गेलेल्या उपक्रमांची संख्या जास्त आहे’, असे ‘नॅशनल पेमेंट्स सिस्टिम डिपार्टमेंट’च्या प्रमुख ॲला बाकिना यांनी स्पष्ट केले.

‘स्विफ्ट’रशियाने 2014 साली क्रिमिआवर ताबा मिळविल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियन बँकांसह आर्थिक व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. त्यावेळी रशियाला ‘स्विफ्ट’मधून बाहेर काढण्याचीही मागणी झाली होती. पाश्चिमात्यांचे निर्बंध व स्विफ्टमधून बाहेर काढण्याच्या मागणीला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने ‘एसपीएफएस’ या नावाने स्वतंत्र यंत्रणा उभारली होती. सुरुवातीला फक्त रशियन बँका व उपक्रमांपुरत्या मर्यादित असणाऱ्या या यंत्रणेत नंतर चीनच्या बँकांनीही सहभाग घेतला होता. त्यापाठोपाठ रशियाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘युरेशियन युनियन’मधील देशांनाही सामील करून घेण्यात आले होते.

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांचा प्रभाव असलेल्या वित्तसंस्था, यंत्रणा तसेच चलनांचा वापर बंद करण्यास सुरुवात केली असून पर्यायी वापरासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादलेले देश रशियाच्या या पर्यायी व्यवस्थेला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे रशियाकडून उभारण्यात येणाऱ्या पर्यायी यंत्रणांसह स्थानिक चलनाचा वापर तसेच इतर उपक्रमांना यश मिळत असल्याचे समोर येत आहे.

leave a reply