इराणमधील सरकारविरोधी निदर्शनात 50 जणांचा बळी

- इराणच्या राष्ट्राध्यक्षांकडून निदर्शकांवर निर्णायक कारवाईचा इशारा

50 जणांचा बळीतेहरान – गेल्या आठ दिवसांपासून इराणमध्ये पेटलेल्या हिजाबविरोधी निदर्शनांमध्ये किमान 50 जणांचा बळी गेला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी 80 हून अधिक शहरांमध्ये केलेल्या कारवाईत 739 निदर्शकांना ताब्यात घेतले असून यामध्ये महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या निदर्शनांच्या माध्यमातून इराणची सुरक्षा आणि सौहार्दाला हादरे देणाऱ्या निदर्शकांवर निर्णायक कारवाई करणार असल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी दिला. कठोर कारवाईनंतरही या निदर्शनांना इराणमध्ये व इराणबाहेर देखील मिळत असलेला प्रतिसाद इराणच्या राजवटीसमोरील आव्हाने तीव्र करीत असल्याचे दिसत आहे.

1979 साली इराणमध्ये इस्लामी क्रांतीसाठी झालेल्या जनआंदोलनानंतर पहिल्यांदाच या देशात इतक्या व्यापक प्रमाणात पेटलेले हे पहिलेच आंदोलन असल्याचा दावा केला जातो. गेल्या आठवड्यात माहसा अमिनी या 22 वर्षीय कुर्दवंशिय तरुणीचा इराणी सुरक्षा यंत्रणेच्या कैदेत बळी गेल्यानंतर सरकारविरोधी निदर्शनांचा भडका उडाला. माहसा अमिनी हिने इराणमधील हिजाब सक्तीच्या विरोधात आवाज उठविला होता.

याआधीही इराणमधील तरुणी व महिलांनी याविरोधात निदर्शने केली होती. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष रोहानी यांच्या कार्यकाळात देखील याच्या विरोधात निदर्शने भडकली होती. पण माहसाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या प्रांतात भडकलेल्या निदर्शनांनी जगाचे लक्ष खेचून घेतले. हिजाब पेटवून दिल्याचे व स्वतःचे केस कापून इराणच्या राजवटीचा निषेध नोंदविण्याचे कित्येक व्हिडिओज्‌‍ व्हायरल झाले असून यामध्ये इराण व इतर देशांच्या महिलांच्या व्हिडिओज्‌‍चा समावेश आहे. त्याला जगभरातून मिळत असलेला प्रतिसाद इराणसमोरील आव्हाने अधिकच वाढवित आहे.

50 जणांचा बळीअवघ्या आठवड्याभरात इराणच्या महत्त्वाच्या 80 शहरांमध्ये निदर्शने भडकली असून रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जवानांना निदर्शकांकडून मारहाण केली जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मशाद, शिराझ, तबरिझ, कराझ आणि कुशान या शहरांमध्ये निदर्शक आणि इराणच्या जवानांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये किमान पाच जवान मारले गेले असून रिव्होल्युशनरी गार्ड्स ही संख्या लपवित असल्याची शक्यता समोर येत आहे.

गेली कित्येक वर्षे इराणचे सर्वाधिकार असलेले सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात इराणच्या जनतेमध्ये असंतोष खदखदत होता. माहसाच्या मृत्यूमुळे या असंतोषाला वाव मिळाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. या निदर्शनांमुळे इराणमध्ये पुन्हा एकदा आयातुल्ला खामेनी यांच्या पोस्टर्सची जाळपोळ करण्याचे सत्र सुरू झाले आहे. इराणमधील धार्मिक आणि राजवटीचा प्रभाव असलेली शहरे म्हणून ओळख असलेल्या कोम आणि इसफाहन येथे देखील खामेनी यांचे पोस्टर्स जाळण्याचे प्रकार घडले आहेत. इतकेच नाही तर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ कमांडर आणि लष्कराचे हिरो मानले जाणाऱ्या कासेम सुलेमानी यांचे पोस्टर्स देखील आंदोलकांनी फाडल्याच्या घटना घडल्या आहेत, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

इराकच्या कुर्द भागावर इराणचे जोरदार हल्ले

50 जणांचा बळीतेहरान – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी शनिवारी इराकच्या कुर्दिस्तान भागावर तोफांचा मारा केला. येथील इराणविरोधी दहशतवाद्यांवर ही कारवाई केल्याचे सांगून इराणने या कारवाईचे समर्थन केले. तर माहसा अमिनी या कुर्द महिलेच्या हत्येनंतर आपल्या देशात भडकलेल्या निदर्शनांना इराकच्या कुर्दिस्तानातून समर्थन मिळत असल्याचा आरोप इराण करीत आहे. त्यामुळे ही कारवाई केल्याचे इराणचे म्हणणे आहे.

इराण सरकारसंलग्न वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी शनिवारी रात्री इराकच्या कुर्दिस्तान प्रांतावर जोरदार हल्ले केले. इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातून धडालेल्या तोफांद्वारे कुर्दिस्तान प्रांतातील इराणविरोधी दहशतवाद्यांच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. या दहशतवादी संघटनेच्या काही सदस्यांना इराणच्या गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्याची माहिती इराणच्या वृत्तवाहिनीने दिली. पण या कारवाईवर अधिक प्रकाश टाकण्याचे इराणने टाळले आहे.

आपल्या देशात भडकलेल्या निदर्शनांना विदेशातून सहाय्य मिळत असल्याचा आरोप इराणमधील माध्यमे करीत आहेत. इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील इराणविरोधी दहशतवादी संघटनांना हाताशी धरून हे आंदोलन पेटविले जात असल्याची टीका इराणी माध्यमांनी केली होती. इराणने थेट उल्लेख केला नसला तरी यासाठी अमेरिकेला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. काही तासांपूर्वीच अमेरिकेने इराणवरील इंटरनेटचे निर्बंध मागे घेऊन निदर्शकांना सरकारविरोधी आंदोलन जगभरात पोहोचविण्याचे आवाहन केले होते.

leave a reply