गुगलकडून भारतात १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा

नवी दिल्ली – गुगल भारतात १० अब्ज डॉलर्सची (७५ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहेत. गुगलचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ‘गुगल फॉर इंडिया’ या व्हर्च्युअल कॉन्फरन्स दरम्यान ही मोठी घोषणा केली. त्याआधी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचाई यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विविध विषयावर चर्चा झाली. यानंतर काही तासातच पिचाई यांनी केलेली ही घोषणा लक्षवेधी ठरते.

Google-Indiaसोमवारी सकाळी पंतप्रधान मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची विविध विषयावर चर्चा झाली. कोरोनासाथीमुळे उभे केलेले आव्हान आणि बदललेल्या कार्यसंस्कृतीवर पंतप्रधान मोदी आणि पिचाई यांनी चर्चा केली. याशिवाय डेटा सुरक्षा, सायबर सुरक्षा, डिझिटायझेशन या विषयांवरही चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील शेतकरी, तरुण आणि उद्योजकांचे जीवन बदलण्याबातही पिचाई यांच्याबरोबर चर्चा केल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले.

यानंतर काही तासातच पिचाई यांनी ‘गुगल फॉर इंडिया’ या व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये आपली कंपनी भारतात ७५ हजार कोटी रुपये पुढील पाच वर्षात गुंतवणार असल्याचे जाहीर केले. भारतात डिझिटल अर्थव्यस्थेला गती देण्यासाठी ‘डिझीटायझेशन फंड’ म्हणून ही गुंतवणूक करण्यात येईल. इक्विटी, भागीदारी आणि पायभूत सुविधांच्या माध्यमातून ही गुंतवणूक होणार असल्याचे पिचाई यांनी म्हटले आहे.

गुगल भारतात डिझिटायझेशनच्या या आपल्या कार्यक्रमाद्वारे चार गोष्टींकडे लक्ष पुरविणार आहे. भारतीयांना मातृभाषेत माहिती उपलब्ध करून देणे, आरोग्य, शेती, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) फायदा पोहोचविणे, भारताच्या आवश्यकतेनुसार डिजिटल उत्पादनांच्या निर्मितीवर गुगलचा भर असेल, असे सुंदर पिचाई म्हणाले.

leave a reply