सरकार ३७१ आयात उत्पादनांसाठी गुणवत्ता निकष निश्चित करून चीनला दणका देणार

नवी दिल्ली – देशात आयात होणाऱ्या ३७१ उत्पादनांना भारतीय गुणवत्ता मानकाच्या (आयएस) अंतर्गत आणण्यात येणार आहे. खराब गुणवत्ता आणि अनावश्यक वस्तूंची आयात रोखण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत असून मार्च पर्यंत हे हे गुणवत्ता निकष लागू होतील. याचा सर्वात मोठा फटका हा चीनमधून आयात वस्तूंना बसणार आहे. त्यामुळे चीनला आर्थिक दणके देण्यासाठी घेतल्या जात असलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडेही पहिले जात आहे.

वाणिज्य मंत्रालयाने आयात होणाऱ्या ३७१ वस्तूंची यादी तयार केली आहे. या वस्तुंसाठी गुणवत्ता निकष तयार केले जात आहेत. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’च्या (बीआयएस) सहाय्याने हे निकष तयार करण्याचे काम सुरु आहे. काही वस्तू या अत्यंत कमी प्रमाणात आयात केल्या जातात. अशा वस्तूंसाठी गुणवत्ता निकषांची आवश्यकता नाही. मात्र काही उत्पादने मोठ्या प्रमाणावर आयात होतात. त्यांच्यासाठी गुणवत्ता निकष ठरविले जात आहेत, अशी माहिती ‘बीआयएस’चे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी दिली आहे.

सरकार ३७१ आयात उत्पादनांसाठी गुणवत्ता निकष निश्चित करून चीनला दणका देणारवाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या यादीत चीनमधून आयात उत्पादनांसह इतर देशातून आयात उत्पदनांचा समावेश आहे. या वस्तूंसाठी गुणवत्ता मानक ठरविण्याचे आणि त्याच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत, असे तिवारी यांनी म्हटले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर पर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यामध्येही ज्या आयात उत्पादनांचे गुणवत्ता निकष तयार करण्याचे बाकी राहील, ते काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

ज्या वस्तूंसाठी हे गुणवत्ता निकष तयार केले जात आहेत, त्यामध्ये खेळणी, स्टील बार, स्टील ट्यूब, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दूरसंचार उपकरणे, अवजड यंत्रे, पेपर, रबर, रसायने, औषधे या सारख्या क्षेत्रातील वस्तूंचा समावेश आहे. खराब गुणवत्तेच्या वस्तूंची आणि अनावश्यक आयात रोखण्यासाठी हे निकष तयार केले जात असल्याचे सांगण्यात येत असले, तरी या यादीत समावेश असलेली बहुतांश उत्पादने चीनमधून आयात होतात. त्यामुळे चीनला भारताने दिलेला आणखी एक दणका ठरणार आहे.

आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी सुरु असलेल्या ‘आत्मनिर्भर अभियानां’तर्गत हे आयात मालासाठी गुणवत्ता निकष बनविले जात आहेत. यासाठी कांडला, जेएनपीटी, कोच्ची या महत्वाच्या बंदरांमध्ये आयात वस्तुंची गुणवत्ता तपासण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

दरम्यान, देशात रासायने, उपचार साहित्याचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी बल्क ड्रग उत्पादन आणि मेडिकल डिवाइस पार्क उभारण्याची योजना आहे, असे केंद्रीय रसायनमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले. सध्या देशात या क्षेत्रात बहुतांश आयात चीनमधून होते. त्यामुळे हा सुद्धा चीनसाठी मोठा झटका सिद्ध होणार आहे.

leave a reply