हिजबुल्लाहच्या चुकीची किंमत लेबेनॉनला मोजावी लागेल

इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

जेरूसलेम – ‘इस्रायलच्या सीमेत घुसखोरी करण्याची आणि हल्ले चढविण्याची हिजबुल्लाहच्या चुकीची मोठी किंमत लेबेनॉनला याधीही चुकवावी लागली आहे. नसरल्लाने त्या चुकीची पुनरावृती करू नये. अन्यथा हिजबुल्लाहच्या चुकीची जबर किंमत संपूर्ण लेबेनॉनला मोजावी लागेल’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडल्यानंतर इस्रायली पंतप्रधानांनी कठोर शब्दात लेबेनॉनला बजावले.

हिजबुल्लाहच्या चुकीची किंमत लेबेनॉनला मोजावी लागेलइस्रायली लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या उत्तरेकडील भागातून घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी सीमेवर तैनात इस्रायली सैनिकांवर गोळीबारही केला. पण आपल्या जवानांनी हिजबुल्लाहची ही घुसखोरी यशस्वीरित्या हाणून पाडल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. यानंतर पंतप्रधान नेत्यान्याहू आणि संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी हिजबुल्लाह, लेबेनॉन आणि इराणला पुढील परिणामांची जाणीव करुन दिली. ‘आपल्या हद्दीत घुसखोरी करण्याचे हिजबुल्लाहचे हे प्रयत्न इस्रायल अधिक गांभीर्याने घेत आहे. यापुढे लेबेनॉनच्या सीमेतून इस्रायलच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा कट आखला गेला तर त्याची संपूर्ण जबाबदारी हिजबुल्लाह आणि लेबेनॉनच्या नेतृत्वावर असेल’, असे नेत्यान्याहू यांनी बजावले.

हिजबुल्लाहच्या चुकीची किंमत लेबेनॉनला मोजावी लागेलत्याचबरोबर हिजबुल्लाहने आगीशी खेळ करु नये, असा इशाराही इस्रायलच्या पंतप्रधानांनी यावेळी दिला. यासाठी नेत्यान्याहू यांनी २००६ साली हिजबुल्लाहमुळे छेडल्या गेलेल्या दुसर्‍या लेबेनॉन युद्धाची आठवण करुन दिली. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला पुन्हा एकदा २००६ सालच्या चुकीची पुनरावृत्ती करणाच्या प्रयत्नात असल्याचा आरोप नेत्यान्याहू यांनी केला. लेबेनॉनच्या सरकारने वेळीच हिजबुल्लाहच्या इस्रायलविरोधी कारवाया रोखल्या नाही तर यापुढील परिणामांची झळ लेबेनॉनला बसेल. पण त्याचबरोबर सिरिया आणि लेबेनॉनमध्ये तळ ठोकून इस्रायलमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इराणला देखील याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. कुठल्याही परिस्थितीत इराणला सिरिया आणि लेबेनॉनमध्ये तळ ठोकू देणार नाही’, असे नेत्यान्याहू यांनी बजावले. तर आपल्या देशाचे सार्वभौमत्व तसेच जवानांची सुरक्षा यासाठी इस्रायल याआधीपेक्षाही अधिक सज्ज असल्याचे इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी स्पष्ट केले.

हिजबुल्लाहचे दहशतवादी भुयारीमार्गाने इस्रायलमध्ये घुसखोरीच्या तयारीत असल्याचा इशारा काही महिन्यांपूर्वी इस्रायलने दिला होता. या घुसखोरीसाठी हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी सीमाभागात खोदलेली भुयारे शोधून, ती बुजविण्याची मोहीमही इस्रायली लष्कराने पार पाडली होती. दरम्यान, २००६ साली हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत घुसून इस्रायली सैनिकांचे अपहरण केले होते. त्यानंतर इस्रायलने लेबेनॉनमध्ये सैन्य घुसवून हिजबुल्लाहच्या विरोधात ३४ दिवसांचा संघर्ष छेडला होता.

leave a reply