ग्रामीण भागासाठी सरकारची ‘ई-रिटेल’ सेवा

नवी दिल्ली, ( वृत्तसंस्था) – लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता केंद्र सरकारने अमेझॉन; फ्लिपकार्डसारखी स्वदेशी ई-रिटेल सेवा सुरु केली आहे. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिक ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करू शकतात. ग्रामीण क्षेत्रात  राहणाऱ्या नागरिकांना  जीवनावश्यक  वस्तू मिळत नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासाठी सरकारने ही ई-रिटेल सेवा सुरु केली आहे.’कॉमन सर्विस सेंटर’ मार्फत (सीएससी)  ही सेवा हाताळण्यात येणार आहे.  ‘सीएससी’च्या ३.८ लाख आऊटलेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ६० लाख नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केंद्र सरकार याद्वारे करीत  आहे.

लॉकडाऊनमुळे जीवनाश्यक  वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडचणी येत असल्याने सरकारने गावपातळीवर ऑनलाईन रिटेल चेनची स्थापना केली आहे. या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन ऑर्डर घेण्यात येईल आणि होम डिलिव्हरी करण्यात येईल. ” सीएससी ‘ खाजगी आऊटलेट आहेत, पण ही केंद्रे सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात. या सेवा केंद्रांना भाजीपाला, दूध, डाळी, फळे आणि इतर उत्पादने विक्री आणि पुरवण्याची जबाबदारी सरकारने दिली असल्याचे सीएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश त्यागी यांनी म्हटले.

ग्राहक ऑनलाइन जाऊन यासाठी तयार केलेल्या अ‍ॅपमधून वस्तू मागवू शकतात. ग्रामीण भागातील उद्योजकांना हे अ‍ॅप  देण्यात आले आहे. यासह किरकोळ आणि ई-रिटेलची जबाबदारी देणाऱ्या सेवा केंद्रांना ही अ‍ॅप देण्यात आली आहेत. याचबरोबर ग्रामीण पातळीवरील उद्योजक देखील ऑफलाइन ऑर्डर घेतात आणि नंतर एका दिवसात किंवा काही तासांत वस्तू ग्राहकांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करतात असेही त्यागी म्हणाले. 

आतापर्यंत दोन हजार सीएससी केंद्र जोडण्यात आली आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ५ हजार नागरिकांनी सामानाची मागणी नोंदविली असून २० लाख रुपये किंमतीचे सामान पोहचविण्यात आले आहे. प्रत्येक केंद्राला ५  ते १० किलोमीटरच्या परिसरात पुरवठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यागी यांनी दिली 

leave a reply