तुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशारा

अथेन्स – तुर्कीने एखाद्या शत्रूप्रमाणे चिथावणीखोर कारवाया करणे सुरू ठेवले तर तुर्कीवर निर्बंध लादण्यासाठी ग्रीस अधिक आक्रमक पावले उचलेल, असा इशारा ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकॉस डेन्दिआस यांनी दिला. पुढील आठवड्यात होणार्‍या नाटोच्या बैठकीत ग्रीस व तुर्कीचे नेते परस्परांची भेट घेतील, असे संकेत देण्यात आले आहेत. या भेटीपूर्वी तुर्कीकडून पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्ये सुरू झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर ग्रीसने तुर्कीला समज दिल्याचे दिसते.

तुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशाराभूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनसाठ्यांच्या मुद्यावरून ग्रीस व तुर्कीमध्ये सध्या तणाव आहे. तुर्कीने ग्रीसनजिकच्या सागरी क्षेत्रात इंधन उत्खनन तसेच संशोधनासाठी जहाजे पाठवून ग्रीसला चिथावणी दिली होती. त्याविरोधात ग्रीसनेही आक्रमक भूमिका घेतली असून आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी भूमध्य सागरी क्षेत्रात ग्रीस व तुर्कीमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र अमेरिका व युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने संघर्ष टळला होता. संघर्ष टळला असला तरी दोन देशांमधील तणाव अजूनही कायम आहे.

तुर्कीच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात ग्रीसच्या विरोधात एकमागोमाग एक चिथावणीखोर वक्तव्ये करण्याचा सपाटा लावला आहे. तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलुत कावुसोग्लु यांनी गेल्या आठवड्यात ग्रीसला दिलेल्या भेटीत, वेस्टर्न थ्रेस प्रांतातील अल्पसंख्य समुदायाचा उल्लेख तुर्कीवंशिय अल्पसंख्य असा केला होता. त्यानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, ऑटोमन साम्राज्याचा दाखला देत या साम्राज्याचा भाग असलेल्या क्षेत्राचे रक्षण करण्यास तुर्की सज्ज असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी नौदल सरावातील तुर्कीचे सामर्थ्य व क्षमता पाहून ग्रीस घाबरल्याची बढाई देखील मारली होती.तुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशारा

तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलुसी अकर यांनी, ग्रीसने एजिअन सीमधील बेटांवरून आपली संरक्षणतैनाती मागे घ्यावी, असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ तुर्कीतील सत्ताधारी ‘एकेपी’ पक्षाचे प्रवक्ते ओमर सेलिक यांनी, भूमध्य सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या फ्रेंच युद्धनौका ग्रीस व तुर्कीमधील वाद सोडवू शकणार नाहीत, असे वक्तव्य केले आहे. त्याचवेळी युरोपिय महासंघ अथवा इतरांच्या दबावापुढे तुर्की झुकणार नसल्याचेही म्हटले होते.

तुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशारातुर्की नेत्यांकडून एकापाठोपाठ एक करण्यात आलेल्या या वक्तव्यांचे ग्रीसमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री निकॉस डेन्दिआस यांनी पुन्हा एकदा निर्बंधांचा इशारा देऊन तुर्कीला आक्रमक संदेश दिला. ‘ग्रीसने यापूर्वी तुर्कीचा युरोपिय महासंघात समावेश व्हावा, यासाठी समर्थन दिले होते. मात्र तुर्कीने अशारितीने आपल्या चिथावणीखोर कारवाया व वक्तव्ये सुरू ठेवली तर ग्रीस युरोपिय महासंघाला निर्बंध लादण्यासाठी भाग पाडू शकतो’, असे ग्रीक परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

गेल्या महिन्यात, युरोपिय सदस्य देशांनी तुर्कीला शस्त्रास्त्रांची विक्री करू नये यासाठी ग्रीसने आक्रमक मोहीम सुरू केली होती. तुर्कीला शस्त्रविक्री केल्यास त्याचा वापर युरोपिय देशांच्या विरोधातच होऊ शकतो, अशी आग्रही भूमिका ग्रीक नेत्यांनी मांडली होती. ग्रीसच्या तुर्कीविरोधी मोहिमेला फ्रान्स व ऑस्ट्रियासारख्या देशांनी समर्थन दिले होते.

leave a reply