ग्रीस तुर्कीला प्रत्युत्तर देताना कचरणार नाही

ग्रीसचा तुर्कीला इशारा

erdoganअथेन्स – ‘तुर्कीने चिथावण्या दिल्या तरी ग्रीस या जाळ्यात अडकणार नाही. कारण ग्रीसला शांतता हवी आहे. मात्र तुर्कीने ग्रीसच्या सुरक्षेला धक्का देण्याचा प्रयत्न तुर्कीने केलाच, तर तुर्कीला प्रत्युत्तर देताना ग्रीस अजिबात कचरणार नाही’, असा इशारा ग्रीसने दिला. तुर्की रातोरात हल्ले चढवून ग्रीसमध्ये दाखल होईल, अशी धमकी तुर्कीने दिली होती. त्यावर ग्रीसची ही प्रतिक्रिया आली आहे.

ग्रीसच्या विरोधात सर्व ताकदीचा वापर केला जाईल, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी याआधी अनेकवार दिली होती. पण गेल्या आठवड्यात झेक प्रजासत्ताकमध्ये आयोजित युरोपिय देशांच्या बैठकीतच राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी युरोपिय देशांच्या नेत्यांसमोर ग्रीसला धमकावले. ग्रीसबरोबर चर्चा शक्य नसल्याचे सांगून तुर्कीने दिलेले इशारे गांभीर्याने घ्यावेत, असे एर्दोगन यांनी बजावले होते. याद्वारे तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ग्रीस तसेच ग्रीसच्या पाठिशी असलेल्या अमेरिकेला बजावल्याचा दावा विश्लेषकांनी केला होता.

एर्दोगन यांच्या धमकीला काही तास उलटत नाही तोच, तुर्कीचे ड्रोन्स ग्रीसच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या बातम्या येत आहेत. पहिल्या ड्रोनने किनारोस बेटाच्या हद्दीत तर दुसऱ्या ड्रोनने त्रियानिसिया बेटाच्या हद्दीतून प्रवास केल्याचा आरोप ग्रीस करीत आहे. याआधीही तुर्कीने ग्रीसच्या सागरीहद्दीत गस्तीनौका तर हवाईहद्दीत लढाऊ विमाने रवाना केली होती. त्यामुळे ग्रीसला धमकावणाऱ्या तुर्कीने ग्रीसच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याची टीका होत आहे.

Greece Yiannis Oikonomouथेट युरोपिय देशांच्या बैठकीत धमकावणाऱ्या तुर्कीला ग्रीसने खडसावले. तसेच शांततेचे धोरण स्वीकारणाऱ्या ग्रीसला तुर्कीने कमी लेखण्याची जोखीम पत्करू नये, असा इशारा ग्रीसच्या सरकारचे प्रवक्ते यानिस इकॉनॉमो यांनी दिला. तुर्कीच्या ग्रीसविरोधी धमक्या किंवा कारवायांना ग्रीसकडून प्रत्युत्तर मिळाल्याखेरीज राहणार नाही, असे ग्रीसचे प्रवक्ते इकॉनॉमो यांनी बजावले. 2020 सालापासून तुर्कीने ग्रीसच्या विरोधात आपल्या कारवाया तीव्र केल्याचा आरोप इकॉनॉमो यांनी केला. निर्वासितांच्या लोंढ्यांचा शस्त्रासारखा वापर करून तुर्कीने ग्रीसची सुरक्षा धोक्यात आणल्याचा ठपका इकॉनॉमो यांनी ठेवला आहे.

दरम्यान, ग्रीस व तुर्कीमधील वादाचा मुद्दा ठरणाऱ्या एजियन समुद्रात दोन्ही देशांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या आहेत. अमेरिकेने भेट म्हणून दिलेली लष्करी वाहने ग्रीसने या बेटांवर तैनात केल्याची टीका तुर्कीने केली होती. तर तुर्कीची लढाऊ विमाने आणि गस्तीनौका आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याचा ठपका ग्रीसने ठेवला होता. नाटोचे सदस्य असलेल्या या दोन्ही देशांमधील वाद भूमध्य समुद्रातील तणाव वाढवित आहे.

leave a reply