सौदीला साथ दिली तर युएईचे भविष्य भयावह असेल

येमेनच्या हौथी बंडखोरांची धमकी

तेहरान – ‘युएईने येमेनमधील युद्धात सहभागी होऊ नये, सौदीला या युद्धात साथ देऊ नये. अन्यथा युएईचे भविष्य अतिशय भयावह असेल’, अशी धमकी येमेनमधील हौथी या बंडखोर संघटनेने दिली. गेल्याच आठवड्यात येमेनमधील संघर्षबंदी संपुष्टात आली. हौथी बंडखोरांनी संघर्षबंदीची मुदत वाढविण्यास नकार दिल्यामुळे हा संघर्ष नव्याने भडकणार असल्याचा दावा केला जातो. या वर्षाच्या सुरुवातीला हौथींनी युएईची राजधानी दुबईवर ड्रोन्स व बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. त्यामुळे हौथींनी दिलेल्या या धमकीचे गांभीर्य वाढले आहे.

Yemen Houthiसंयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने सहा महिन्यांपासून येमेनमध्ये लागू असलेली संघर्षबंदी गेल्या आठवड्यात संपुष्टात आली. येमेनच्या लष्कराप्रमाणे हौथी बंडखोरांनी देखील संघर्षबंदीची मुदत वाढविण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघ व सौदी अरेबियाने केले होते. पण हौथी बंडखोरांनी संघर्षबदीची मुदत वाढविण्यास नकार दिल्यामुळे येमेनमधील संघर्ष भडकणार असल्याचे इशारे अमेरिका व अरब मित्रदेश देत होते.

‘अन्सरुल्ला’ या हौथी बंडखोरांच्या राजकीय विभागाचा सदस्य अब्दुल्ला मोहम्मद अल-नईमी याने सोशल मीडियावर युएईला उद्देशून धमकी दिली. गेल्या सात वर्षांपासून येमेनमध्ये भडकलेल्या गृहयुद्धात सौदी अरेबियाला साथ देणाऱ्या युएईला हौथीच्या कमांडरने येत्या काळातील संघर्षापासून अलिप्त राहण्याचा इशारा दिला. ‘सौदीने येमेनमध्ये पुकारलेल्या युद्धात युएई सहभागी झाल्यास, या देशाचे भविष्य भयावह असेल. या युद्धात युएई आपले सर्वस्व गमावून बसेल. कावळे आणि सापांनी भरलेले वाळवंट अशा दशकांपूर्वीच्या भूतकाळात युएईला परत पाठवू’, असे नईमी याने बजावले.

हौथींच्या या हल्ल्यांमुळे लवकरच उद्योजक आणि गुंतवणूकदार युएई सोडून जातील, असा दावा नईमी याने केला. गेल्या आठवड्यात संघर्षबंदीतून बाहेर पडलेल्या हौथी बंडखोरांनी सौदी व युएईला धमकावणे सुरू केले आहे. यातही हौथी बंडखोर युएईला सर्वाधिक लक्ष्य करीत आहेत. काही दिवसांपूर्वी हौथीचा आणखी एक कमांडर मोहम्मद अल-बुखैती याने देखील एका मुलाखतीमध्ये हौथींच्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. पाश्चिमात्य देशांनी आपल्या मागण्या मान्य केल्या नाही, तर सौदी अरेबिया आणि युएईच्या अतिदूर शहरांपर्यंत हल्ले चढविले जातील, असा इशारा बुखैतीने दिला होता.

त्याचबरोबर सौदी व युएईमध्ये गुंतवणूक केलेल्या परदेशी कंपन्यानी ताबडतोब या दोन्ही देशांमधून माघार घ्यावी, असे आणखी एका हौथी कमांडरने म्हटले होते. या वर्षाच्या सुरुवातीला हौथी बंडखोरांनी सौदीची राजधानी रियाध व युएईची राजधानी दुबई येथील इंधन प्रकल्पांवर ड्रोन्स व बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. तर सौदी व युएईच्या सागरी क्षेत्रात तैनात परदेशी जहाजांनाही हौथींच्या ड्रोन्सनी लक्ष्य केले होते. अशा परिस्थितीत, हौथींनी सौदी व युएईतील परदेशी कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर युरोपमधून प्रतिक्रिया आली होती. युरोपिय महासंघाने हौथींच्या धमकीचा समाचार घेत, आखाती क्षेत्र अस्थैर्य करणाऱ्या कारवाया खपवून घेणार नसल्याचे फटकारले होते.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात हौथींनी येमेनच्या लष्करावर हल्ले सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये किमान सहा जवानांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तर येमेनच्या लष्करानेही मारिब प्रांतात हौथींचे दोन ड्रोन्स पाडल्याचे जाहीर केले होते. येमेनमध्ये पुन्हा संघर्ष भडकला आणि हौथींनी युएईवर हल्ले चढविले तर त्याचे थेट परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ शकतात.

leave a reply