शनिवारच्या निदर्शनांनंतर हमास इस्रायलविरोधात नव्या संघर्षाच्या तयारीत

- इस्रायली अधिकाऱ्यांचा दावा

जेरुसलेम/गाझा – शनिवारी गाझापट्टीत झालेली निदर्शने व इस्रायलने नंतर केलेले हवाईहल्ले या पार्श्‍वभूमीवर, हमास इस्रायलविरोधात नव्या संघर्षाच्या तयारीत असल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे. मे महिन्यात झालेल्या इस्रायल-हमास संघर्षात इस्रायलने हमासला चांगला दणका दिल्याचे मानले जाते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हमासने पुन्हा एकदा रॉकेटस्‌चे उत्पादन करणाऱ्या साईट्स सुरू केल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली आहे. रविवारी हमासने पत्रकार परिषद घेऊन निदर्शनांची तीव्रता अधिक वाढविण्याचाही इशारा दिला आहे.

शनिवारच्या निदर्शनांनंतर हमास इस्रायलविरोधात नव्या संघर्षाच्या तयारीत - इस्रायली अधिकाऱ्यांचा दावाअल अक्सा प्रार्थनास्थळ परिसराला लागलेल्या आगीच्या घटनेला 52 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी हमासने निदर्शनांची हाक दिली होती. शनिवारी दुपारी हजारो निदर्शक इस्रायल व गाझामध्ये असणाऱ्या सुरक्षा कुंपणाच्या जवळ जमा झाले. काही काळाने निदर्शकांनी इस्रायली सैनिक तैनात असलेल्या भिंतीजवळ धाव घेतली. यावेळी इस्रायली यंत्रणांनी कारवाई सुरू केल्यावर निदर्शकांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. एका निदर्शकाने हँडगनच्या सहाय्याने इस्रायली सैनिकावर गोळी झाडली. हा सैनिक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते. तर इस्रायली सुरक्षायंत्रणांनी केलेल्या कारवाईत 40हून अधिक निदर्शक जखमी झाले.

शनिवारच्या निदर्शनांनंतर हमास इस्रायलविरोधात नव्या संघर्षाच्या तयारीत - इस्रायली अधिकाऱ्यांचा दावाशनिवारच्या या निदर्शनांनंतर इस्रायली लष्कराने गाझापट्टीतील हमासच्या शस्त्रसाठ्यांवर हल्ले चढविले. ड्रोन्सच्या सहाय्याने करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये शस्त्रसाठ्यांच्या चार साईट्स नष्ट झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. यात मध्य गाझा व खान युनिस भागातील साईट्सचा समावेश आहे. शनिवारी निदर्शकांनी केलेली दंगल व जवानावर झाडण्यात आलेली गोळी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ले चढविण्यात आल्याचे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले. तर इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यांदरम्यान गाझातील गटांनी मशिनगन्सचा जोरदार मारा केल्याचे समोर आले आहे.

तर शनिवारी हमासने दिलेली निदर्शनांची हाक मे महिन्यातील माघारीनंतर वाढलेल्या दडपणाचा भाग असल्याचे सांगण्यात येते. हेच दडपण वाढत असून पुढील काळात निदर्शनांची तीव्रता वाढेल तसेच मोठ्या हल्ल्यांचीही शक्यता आहे, असा दावा इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. इस्रायल व हमासमधील तणाव अधिक वाढत असतानाच इजिप्तने गाझापट्टीतील सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हमासवरील दडपण वाढविणे हा या निर्णयामागील हेतू असल्याचे एका इजिप्शिअन अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

leave a reply