अफगाणिस्तानातील तालिबानच्या यशामागे पाकिस्तानची ‘आयएसआय’

- अमेरिकन संसदेच्या सदस्यांचा आरोप

वॉशिंग्टन – ‘लश्‍कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटना मोर्चे आयोजित करून व गोळ्यांच्या फैरी झाडून अफगाणिस्तानातील तालिबानचा विजय साजरा करीत आहेत. तर पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे प्रमुख फैज हमीद यांचा तालिबानचा नेता मुल्ला बरादर याच्याबरोबरचा फोटोग्राफ जगजाहीर झाला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानात तालिबानला मिळालेल्या यशामागे पाकिस्तान असल्याचा आरोप अधिकच तीव्र होऊ लागला आहे. अमेरिकन संसदेचे सदस्य ‘स्टीव्ह शाबोत्‌’ यांनी याची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ने तालिबानला अफगाणिस्तानचा ताबा मिळवून दिला, असा आरोप केला आहे.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या यशामागे पाकिस्तानची ‘आयएसआय’ - अमेरिकन संसदेच्या सदस्यांचा आरोपअफगाणी जनतेवर अत्याचार करणाऱ्या तालिबानला मिळालेले यश पाकिस्तानचे अधिकारी मोठ्या जल्लोषात साजरे करीत आहेत. ही संतापजनक बाब ठरते, असे काँग्रेसमन शाबोत्‌ म्हणाले. मात्र पाकिस्तानसाठी मानवाधिकारांचे हनन ही विशेष बाब ठरत नाही, याकडे लक्ष वेधून शाबोत्‌ यांनी पाकिस्तानचा मानवाधिकारांबाबतचा इतिहास काळाकुट्ट आहे, याची आठवण करून दिली. पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जातात, याची पुरेशी माहिती अमेरिकन नागरिकांना नाही. आजवर त्याकडे द्यायला हवे होते, तितके लक्ष देण्यात आले नाही. पण आता या आघाडीवर अमेरिकन्सना जागरूक करण्याची वेळ आलेली आहे, असे सांगून स्टीव्ह शाबोत्‌ यांनी आपण यासाठी पुढाकार घेणार असल्याचे संकेत दिले.

पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाच्या मुलींचे अपहरण करून जबरस्तीने त्यांचे लग्न बहुसंख्यांकांमधील वयोवृद्धांशी करून दिले जाते. याची कितीतरी उदाहरणे असल्याचे सांगून मानवाधिकार संघटनांनी याची नोंद घेतलेली आहे, अशी माहिती शाबोत्‌ यांनी दिली. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले अशी खंत शाबोत्‌ यांनी व्यक्त केली. अमेरिका हे सुमारे साठ लाख हिंदूंधर्मियांचे घर असून हे हिंदूधर्मिय अमेरिकन समाजाचा महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेच्या उन्नत्तीसाठी हिंदू समुदायाने फार मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचारांकडे अमेरिकेने दुर्लक्ष करणे अयोग्य ठरते, असे शाबोत्‌ यांनी बजावले आहे.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या यशामागे पाकिस्तानची ‘आयएसआय’ - अमेरिकन संसदेच्या सदस्यांचा आरोपदरम्यान, अफगाणिस्तानातील हिंसाचार व तालिबानच्या अत्याचाराला पाकिस्तान जबाबदार असल्याचा ठपका ठेवणाऱ्या काँग्रेसमन शाबोत्‌ यांनी भारताची प्रशंसा केली. अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांकांना आश्रय देऊन भारताने फार मोठी कामगिरी केल्याचे शाबोत्‌ यांनी म्हटले आहे. याआधीही अमेरिकेतील काही लोकप्रतिनिधी व माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या अपयशाला पाकिस्तानचा विश्‍वासघात कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला होता. तसेच याची किंमत पाकिस्तानला मोजायला लावण्याची गरज असल्याचे हे लोकप्रतिनिधी व माजी राजनैतिक अधिकारी ठासून सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेने पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादण्याची तयारी केलेली आहे, अशी चिंता पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत.

अफगाणिस्तानातील पराजयाचे खापर अमेरिका पाकिस्तानवर फोडल्यावाचून राहणार नाही, याची खात्री पाकिस्तानी माध्यमांना पटली असून या देशाचे माजी राजनैतिक व लष्करी अधिकारी देखील ही भीती व्यक्त करीत आहेत. पाकिस्तानातील काही बेजबाबदार मंडळींनी तालिबानचे यश साजरे करून अमेरिकेच्या संतापात अधिकच भर घातलेली आहे, असे पाकिस्तानी वंशाच्या एका अमेरिकन राजकीय कार्यकर्त्याने बजावले होते. तसेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच तालिबानचा गौरव करणारे उद्गार काढून आपल्या देशाला अडचणीत टाकलेले आहे, अशी खंत पाकिस्तानचे बुजूर्ग पत्रकार करीत आहेत.

leave a reply