इस्रायलबरोबरच्या युद्धासाठी हिजबुल्लाह पूर्ण सज्ज

- हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला

बैरूत/तेहरान – शुक्रवारी १९ रॉकेट्सचे हल्ले चढविणार्‍या हिजबुल्लाहने इस्रायलला थेट युद्धाची धमकी दिली. ‘हे हल्ले म्हणजे सुरुवात होती. हिजबुल्लाह या हल्ल्याची तीव्रता वाढवू शकेल. इतकेच नाही तर हिजबुल्लाह इस्रायलबरोबरच्या युद्धासाठी पूर्ण सज्ज असून हे युद्ध हिजबुल्लाहच जिंकेल’, असा दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाने केला. हिजबुल्लाहने इस्रायलवर चढविलेल्या या रॉकेट हल्ल्यांचे इराणने स्वागत केले आहे. तसेच या पुढच्या युद्धात इस्रायलचा शेवट होईल, असा इशारा इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने दिला आहे.

इस्रायलबरोबरच्या युद्धासाठी हिजबुल्लाह पूर्ण सज्ज - हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लागेल्या आठवड्यात लेबेनॉनच्या दक्षिणेकडून इस्रायलच्या हद्दीत १९ रॉकेट्सचे हल्ले झाले. इस्रायली लष्कराने यातील १० रॉकेट्स यशस्वीरित्या भेदले, तर काही रॉकेट्स मोकळ्या मैदानात कोसळले. हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर पत्रक जारी करून या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. दोन दिवसांपूर्वी इस्रायलने लेबेनॉनमध्ये चढविलेल्या हवाई हल्ल्यांना उत्तर म्हणून हे हल्ले चढविल्याचा दावा हिजबुल्लाहने केला होता.

या रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायल आणि लेबेनॉन सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना, हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाने शनिवारी एका व्हिडिओद्वारे इस्रायलला धमकावले. ‘हिजबुल्लाह लेबेनॉनच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये गुंतून राहिल्याचा इस्रायलने गैरसमज करून घेऊ नये. लेबेनॉनवरील इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना हिजबुल्लाह आपल्या पद्धतीने उत्तर देईल. इस्रायलवर चढविलेले रॉकेट्सचे हल्ले हाच संदेश देणारे होते’, असे नसरल्लाने बजावले.इस्रायलबरोबरच्या युद्धासाठी हिजबुल्लाह पूर्ण सज्ज - हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला

‘आम्हाला युद्ध नको, असे हिजबुल्लाहने कायम म्हटले होते. पण आत्ता हिजबुल्लाह इस्रायलविरोधी युद्धासाठी तयार आहे आणि या युद्धात हिजबुल्लाह इस्रायलला पराभूत करू शकते’, असा दावा नसरल्लाने केला. त्याचबरोबर इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी हिजबुल्लाहकडे वेगवेगळे पर्याय असून इस्रायलच्या ताब्यातील गोलान टेकड्यांवरील हल्ले यापैकी एक पर्याय असल्याचा इशारा नसरल्लाने दिला. इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये २००६ साली लढलेल्या युद्धाला १५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने नसरल्लाने इस्रायलला धमकावले.

इस्रायलबरोबरच्या युद्धासाठी हिजबुल्लाह पूर्ण सज्ज - हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाशुक्रवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी लेबेनॉनला भेट दिली. यावेळी मेजर जनरल सलामी यांनी हिजबुल्लाहचे क्रमांक दोनचे नेते शेख नईम कासेम यांची भेट घेतली. हिजबुल्लाहने चढविलेल्या रॉकेट हल्ल्यांचे समर्थन केले तसेच इराणच्या लष्करी अधिकार्‍याने लवकरच इस्रायलचा शेवट होईल, अशी धमकी दिली.

दरम्यान, इस्रायलच्या हद्दीत रॉकेट हल्ले चढवून युद्धाची धमकी देणार्‍या हिजबुल्लाहची इस्रायलने दखल घेतली. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी हिजबुल्लाहच्या या रॉकेट हल्ल्यांसाठी लेबेनॉनला जबाबदार धरले. तसेच हिजबुल्लाह आणि त्यांचे मालक इराणविरोधात लेबेनीज जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याची आठवण लेबेनॉनच्या सरकारला करून दिली. इस्रायलवर हल्ले चढविणार्‍या हिजबुल्लाहवर लेबेनीज सरकारने वेळीच कारवाई केली नाही तर यापुढील परिणामांसाठी हे सरकारच जबाबदार असेल, असा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला.

leave a reply