हिजबुल्लाहचा छुपा शस्त्रसाठा बैरुतसारख्या आणखी दुर्घटना घडवतील – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

जेरुसलेम – गेल्या आठवड्यात बैरुतमध्ये झालेल्या स्फोटासाठी हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला. त्याचबरोबर बैरुतसारख्या आणखी दुर्घटना रोखायच्या असतील तर हिजबुल्लाहने लेबेनॉनच्या नागरी भागात दडविलेली क्षेपणास्त्रे व इतर शस्त्रसाठा नष्ट करावा लागेल. अन्यथा हिजबुल्लाहचा छुपा शस्त्रसाठा बैरुतसारख्या आणखी दुर्घटना घडवतील, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला. त्याचबरोबर बैरुतमधील पीडितांसाठी इस्रायल देत असलेल्या सहाय्याचा लेबेनॉनने स्वीकार करावा, असे आवाहन नेत्यान्याहू यांनी केले.

बेंजामिन नेत्यान्याहू

आठवड्यापूर्वी लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या अमोनियम नायट्रेटच्या शक्तिशाली स्फोटात २०० हून अधिक जणांचा बळी गेला तर हजारो जण जखमी झाले आहेत. या स्फोटात बंदरात साठवलेला धान्याचा साठा देखील नष्ट झाला असून लेबेनॉनचे १५ ते ३० अब्ज डॉलर्सपर्यंत नुकसान झाल्याचा दावा वेगवेगळ्या संघटना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी जगभरातील प्रमुख देशांना आर्थिक सहाय्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर लेबेनॉनसाठी ३० कोटी डॉलर्सचे सहाय्य जमा झाले असून मॅक्रॉन यांनी केलेल्या या प्रयत्नांचे इस्रायली पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी कौतुक केले. तसेच बैरुतमधील पीडितांसाठी इस्रायलदेखील मदत रवाना करायला तयार आहे. पण लेबेनीज सरकारने वैमनस्य बाजूला ठेवून इस्रायलच्या या मदतीचा स्वीकार करावा, असे आवाहन नेत्यान्याहू यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेत केले.

त्याचबरोबर थेट उल्लेख न करता बैरुतच्या स्फोटासाठी हिजबुल्लाह जबाबदार असल्याचा ठपका नेत्यान्याहू यांनी ठेवला. ‘बैरुतच्या बंदरात घडलेल्या भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर हिजबुल्लाहने लेबेनॉनच्या वेगवेगळ्या शहरांमधील नागरी भागात दडविलेली क्षेपणास्त्रे व स्फोटकांचा साठा नष्ट करावा’, याकडे नेत्यान्याहू यांनी लक्ष्य वेधले. त्याचबरोबर इस्रायलशी संघर्ष छेडून लेबेनॉनच्या समस्या सुटतील, या गैरसमजात राहण्याची हिजबुल्लाहने घोडचूक करु नये, असे इस्रायली पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बजावले. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी देखील लेबेनॉनच्या प्रत्येक शहरातील नागरी भागात हिजबुल्लाहने शस्त्रसाठा लपविल्याचा आरोप केला. येत्या काळात इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये संघर्ष भडकला तर हिजबुल्लाहचा हा छुपा व असुरक्षित शस्त्रसाठा धोकादायक ठरू शकतो, असा इशाराही गांत्झ यांनी दिला.

बेंजामिन नेत्यान्याहू

बैरुतमधील स्फोटासाठी हिजबुल्लाह जबाबदार असल्याचा दावा इस्रायली माध्यमे गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. बैरुतमधील किमान २८ ठिकाणी, नागरी वस्त्यांजवळ हिजबुल्लाहने क्षेपणास्त्र आणि स्फोटके लपविल्याचा दावा या माध्यमांनी गेल्याच महिन्यात केला होता. तर इस्रायली पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी २०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बैरुतमधील हिजबुल्लाहच्या शस्त्रसाठ्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले होते. इराणच्या सहाय्याने हिजबुल्लाहने हा शस्त्रसाठा केल्याचा आरोप नेत्यान्याहू यांनी त्यावेळी केला होता. पण हिजबुल्लाह आणि इराणने इस्रायलचे हे आरोप फेटाळले होते.

दरम्यान, बैरुत स्फोटाप्रकरणी प्राथमिक चौकशीत अमोनियम नायट्रेट्चा असुरक्षित साठा जबाबदार असल्याचे उघड झाले होते. या बंदरातील कस्टम अधिकार्‍यांनी देखील याबाबतचा खुलासा केला होता. पण बाह्यशक्तिंनी क्षेपणास्त्र हल्ला चढवून हा स्फोट घडविल्याचे सांगून लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन यांनी या स्फोटाचे खापर इस्रायलवर फोडण्याचा प्रयत्न केला होता.

leave a reply