इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीने हिजबुल्लाह प्रमुख दडून बसला

- इस्रायली वृत्तवाहिनीचा दावा

हिजबुल्लाह प्रमुखतेल अविव – इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी, वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्यानंतर अमेरिका-इस्रायल आपला काटा काढतील, अशी भीती इराणसंलग्न हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाला सतावित आहे. या भीतीमुळे आपल्या भेटीगाठी रद्द करून नसरल्ला भूमिगत झाला आहे, असा दावा इस्रायलच्या वृत्तवाहिनी केला. याआधीही इस्रायली माध्यमांनी नसरल्ला लेबेनॉनची राजधानी बैरूत येथील बंकरमध्ये दडून बसल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

गेल्या आठवड्यात इराणची राजधानी तेहरानजवळ इराणी शास्त्रज्ञांची हत्या झाली. या हत्येसाठी इराण इस्रायलला दोषी धरत आहे. इस्रायलने एजंट्स वापरुन किंवा रिमोट कंट्रोल मशिनगन्स किंवा इलेक्ट्रॉनिक शस्त्राचा वापर करुन फखरीझादेह यांना मारण्यात आले, असे वेगवेगळे दावे इराण करीत आहे. इस्रायलच्या या कारवाईने लेबेनॉनमधील हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला याची भीतीने गाळण उडाल्याचा दावा ‘चॅनेल 13’ या इस्रायली वृत्तवाहिनीने केला.

हिजबुल्लाह प्रमुख

इराणसंलग्न हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्ला याच्यावर कारवाई करण्यासाठी अमेरिका इस्रायलला सहाय्य करू शकते. या भीतीने हिजबुल्लाहचा प्रमुख भूमीगत झाल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला. गेल्या कित्येक वर्षांपासून नसरल्ला हा इस्रायली सुरक्षा यंत्रणेच्या निशाण्यावर आहे. सुलेमानी आणि फखरीझादेह यांच्या हत्येनंतर इस्रायलच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी नसरल्लाने बंकरमध्ये आश्रय घेतल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला.

दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांमध्ये नसरल्ला उघडपणे लेबेनीज जनतेला सामोरा गेलेला नाही. प्रत्येकवेळी नसरल्लाच्या भाषणाच्या व्हिडिओ प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे तो बैरूतमधील बंकरमध्येच दडून असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

leave a reply