संघर्षबंदीचे उल्लंघन करून हौथींचे येमेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले

सना – संयुक्त राष्ट्रसंघाने कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी युध्द संघर्ष सुरू असलेल्या देशांना संघर्षबंदीचे आवाहन केले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच येमेनमधील हौथी बंडखोरांनी संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली आहे. हौथी बंडखोरांनी गेल्या ४८ तासात २४१ वेळा उल्लंघन केले आहे. ह्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने हौथी बंडखोरांशी चर्चेची तयारी दाखवली आहे.

हौथी बंडखोरांनी मरीब या शहरासह, अल-जाफ आणि निहम शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. गेल्या ४८ तासांपासून या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे, अशी माहिती येमेनी लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून या भागात हौथी बंडखोरांनी हल्ले चढविले असून या हल्ल्यांमुळे सुमारे ४० हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत.

चार वर्षांपूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनी हादी सरकारविरोधात संघर्ष पुकारला होता. हादी सरकारच्या बचावासाठी सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी हादी सरकारला पाठिंबा देऊन हौथींचा मुकाबला करण्यासाठी सशस्त्र गट तयार केला होता. सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाने संघर्ष सुरू असलेल्या गटांना संघर्षबंदीचे आवाहन केले होते. त्यानुसार सौदीने दोन आठड्यांसाठी संघर्षबंदीची घोषणा केली होती. पण हौथी बंडखोरांनी ही संघर्षबंदी मान्य नसल्याचे सांगून हे सौदी अरेबियाचे आपल्याविरोधातील षडयंत्र आहे, असा आरोप हौथी बंडखोरांनी केला आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी तयार रहा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितल्यानंतर सौदी अरेबियाने हौथी बंडखोरांशी चर्चेची तयारी दाखवली आहे.

leave a reply