अमेरिकेने फंडिंग रोखून ‘डब्ल्यूएचओ’च्या मुसक्या आवळल्या

वॉशिंग्टन – “दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) सुमारे ४० ते ५० कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य करणाऱ्या अमेरिकेला यापुढे हा निधी अधिक चांगल्या पद्धतीने वापरायचा आहे. म्हणूनच माझा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी जागतिक आरोग्य संघटनेला पुरविली जाणारी अर्थसहाय्य रोखण्याचे आदेश दिले आहेत, अशा घणाघाती शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ला फटकारले. ‘डब्ल्यूएचओ’ने अक्षम्य दिरंगाई करून चीनच्या बाजूने केलेला पक्षपात यामुळेच जगावर कोरोनाव्हायरस या साथीचे संकट कोसळले, असे सांगून ट्रम्प यांनी आपल्या या निर्णयाचे समर्थन केले.

चीनच्या वुहानमध्ये या साथीचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आपले निरिक्षक पाठवून याची चौकशी करणे अपेक्षित होते. त्याऐवजी यासाथीबाबत लपवाछपवी करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना ‘डब्ल्यूएचओ’ने साथ दिली. त्यामुळे चीनच्या एका भागातच रोखता येऊ शकणाऱ्या या साथीचे जागतिक महामारीत रूपांतर झाले व आज जग त्याची जबरदस्त किंमत चुकती करीत आहे. हे सारे ‘डब्ल्यूएचओ’च्या बेजबाबदारपणामुळे घडले आहे. अमेरिका दरवर्षी ‘डब्ल्यूएचओ’ला सुमारे ४० ते ५० कोटी डॉलर्स इतके भरीव अर्थसहाय्य देते, तरी याहून कमी निधी देणाऱ्या चीनची बाजू ‘डब्ल्यूएचओ’ उचलून धरत आली आहे, अशी टीका ट्रम्प यांनी केली.

मात्र यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’चे अर्थसहाय्य रोखत आहे, या निधीचा अमेरिका पुढच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने वापर करेल, असे सांगून ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’सहित चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. अमेरिकेच्या इतर नेत्यांनीही कोरोनाव्हायरसच्या साथीला जबाबदार असणाऱ्या चीनचा बचाव करणार्‍या ‘डब्ल्यूएचओ’ला लक्ष्य केले होते. जपान, ब्रिटन व तैवान या देशांनी अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या या टीकेला दुजोरा दिला होता. त्यामुळे लवकरच अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’सह चीनलाही धडा शिकवणार असल्याचे संकेत मिळत होते.

‘डब्ल्यूएचओ’ला मिळणाऱ्या एकूण निधीपैकी जवळपास १५ टक्के इतका निधी अमेरिकेकडून पुरविला जातो. अमेरिका हा ‘डब्ल्यूएचओ’ला सर्वाधिक फंडिंग करणारा देश आहे. यामुळे ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचे फार मोठे परिणाम संभवतात. चीनने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे कोरोनाव्हायरस विरोधी लढ्यावर परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त करून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेने आपली जबाबदारी झटकू नये, असे आवाहन केले आहे. जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केली.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. पुढच्या काळात अमेरिकेचा इतर मित्र देशांकडूनही याला दुजोरा मिळण्याची दाट शक्यता आहे. ‘डब्ल्यूएचओ’वरील या कारवाईच्या पाठोपाठ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यासाथीचे उगमस्थान असलेल्या चीनच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी करीत असल्याचेही संकेत मिळत आहेत. आंतरराष्‍ट्रीय माध्‍यमांमध्‍ये अशा स्वरूपाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. कोरोनाव्हायरस यासाथीला जबाबदार असलेल्या चीनकडून जबर दंड वसूल करावा, अशी मागणी करणारी याचिका अमेरिकेच्या न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

एकदा का कोरोनाव्हायरसची साथ नियंत्रणाखाली आली की त्यानंतर चीनच्या विरोधात राजनैतिक आघाडी उघडून या देशाला धडा शिकविला जाईल, असा दावा ब्रिटनच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्यांनी याआधी केला होता. जपानने देखील चीनला पाठीशी घालणाऱ्या ‘डब्ल्यूएचओ’च्या विरोधात अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. चीनसमर्थक अशी ओळख असलेले ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूएस यांच्या राजीनाम्याची मागणी अमेरिकन लोकप्रतिनिधी करीत आहेत. त्याचवेळी पाश्चिमात्य माध्यमांनी टेड्रॉस यांचा भूतकाळ उकरून काढून, त्यांनी चीनचे हस्तक म्हणून केलेल्या कामाचे तपशील जाहीर केले आहेत.

leave a reply