संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाने चीनवर जरब बसविणारी कारवाई करावी

- ‘आयसीजे’च्या अध्यक्षांची मागणी

लंडन – ‘जागतिक महासत्ता बनण्यासाठी चीनने कटकारस्थान आखून साऱ्या जगाला भयंकर संकटाच्या खाईत लोटले आहे. या साथीबाबत साऱ्या जगाला अंधारात ठेवणाऱ्या चीनने मानवतेच्या विरोधात अक्षम्य गुन्हा केला आहे. याचा दंड म्हणून चीनकडून जबर नुकसानभरपाई वसूल करायलाच हवी, अशी मागणी ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ जुरीस्ट’चे (आयसीजे) अध्यक्ष अदिश सी. अग्गरवाला यांनी केली आहे.

जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाव्हायरसचे उगमस्थान चीन हेच असल्याचे दावे आणि आरोप आता तीव्र होऊ लागले आहेत. सर्वच देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा चीनच्या विरोधातील संताप उफाळून येत आहे. जगभरातील न्यायाधीश आणि विधिज्ञांची लंडनस्थित आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या ‘आयसीजे’च्या प्रमुखांनी केलेल्या या मागणीतून जगभरातील जनसामन्यांचा संताप व्यक्त होत आहे.

‘या साथीचा फैलाव चीनच्या वुहानपर्यंतच कसा मर्यादित राहिला? चीनच्या इतर प्रांतांमध्ये का झाला नाही? पण जगभरात ही साथ फैलावली, हे सगळे गुढच आहे’, असा टोला मारुन अग्गरवाला यांनी चीनवर गंभीर आरोप केले आहेत.

‘या साथीद्वारे जैविक युद्ध पुकारुन इतर देशांची अर्थव्यवस्था रसातळाला नेणे आणि आपण स्वत: जागतिक महासत्तापदाच्या सिंहासनावर विराजमान होणे, असा चीनचा डाव होता. म्हणून चीनने जाणूनबूजून जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) या साथीविषयी फार उशिरा कळविले’, असा ठपका अग्गरवाला यांनी ठेवला. त्याचबरोबर कोरोनाव्हायरस ही महामारी नाहीच, हे ‘डब्ल्यूएचओ’ला पटवून देण्यासाठी बरेच काही दडवून ठेवणाऱ्या चीनने आंतरराष्ट्रीय नियमांचे धडधडीत उल्लंघन केल्याचा आरोप अग्गरवाला यांनी केला.

चीनमुळेच जगावर आर्थिक संकट कोसळले असून कित्येक जणांचा रोजगार चीनमुळे हिरावुन घेतला आहे, अशी जळजळीत टीका अग्गरवाला यांनी केली. जगभरात ६५,००० जणांचा बळी घेणाऱ्या आणि जगाचे आर्थिक इंजिन ठप्प करणाऱ्या चीनची राजवट, लष्कर आणि वुहानमधील संबंधित यंत्रणांना मानवाधिकार संघटनेने जबाबदार धरावे. यामुळे, सार्या जगाला हादरे देणाऱ्या चीनला चांगलीच जरब बसेल इतक्या प्रचंड नुकसानभरपाईची रक्कम वसुल करावी, अशी आग्रही मागणी ‘आयसीजे’चे अध्यक्ष अग्गरवाला यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.

leave a reply