देशात कोरोनाव्हायरसामुळे चोवीस तासात ३० जणांचा बळी 

नवी दिल्ली – देशात  कोरोनाव्हायरसामुळे गेल्या चोवीस तासात ३० जणांचा बळी गेला. त्यामुळे देशातील या साथीत दगावलेल्यांची संख्या वाढून १०० च्या पुढे गेली असून १०९ जणांचा मृत्यू आतापर्यंत या साथीमुळे झाला आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या ७०० ने वाढून ४ हजार ६७ वर  पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. मात्र काही वृत्त अहवालानुसार बळींची संख्या ११८ पर्यंत पोहोचल्याचे आणि रुग्ण संख्या ४३०० च्या पुढे गेल्याचे दावे करण्यात येत आहेत.  

देशात केवळ चार दिवसात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढून दुप्पट झाली आहे. तबलिघी जमात  या धार्मिक संघटनेशी संबधित रुग्णांची संख्या यामध्ये अधिक आहे.  आतापर्यंत या संघटनेशी संबंधित  १४४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच या कार्यक्रमातून देशातील विविध राज्यात गेलेले  या संघटनेचे कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंध आलेल्या २५५०० जणांची आतापर्यंत ओळख पटविण्यात आली असून त्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. तसेच या संघटनेशी संबंधित १७५० परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. 
देशात चोवीस तासात ३० जणांचा बळी गेल्याचे आणि रुग्णांची  संख्या ६९३ ने वाढून  ४ हजार ६७ पर्यंत पोहोचल्याचे ते म्हणाले. या साथीमुळे  दगावलेल्यांमध्ये  ६० टक्के रुग्ण हे ६० वर्षांपुढील होते, तर ४० ते ६० वयोगटादरम्यानचे ३० टक्के नागरिक होते, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली आहे. महाराष्ट्रनंतर  तामिळनाडू  आणि त्यानंतर दिल्लीत सार्वधिक रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील रुग्णांची संख्याही ५०० च्या पुढे पोहोचली आहे. 

leave a reply