मानवता आण्विक विनाशापासून एका पावलाच्या अंतरावर आहे

- संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांचा इशारा

आण्विकसंयुक्त राष्ट्रे – युक्रेनमधील युद्ध आणि आशिया व आखातातील आण्विक धोके या पार्श्वभूमीवर एक चूक मानवतेला आण्विक संहाराकडे नेऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी दिला. सोमवारपासून न्यूयॉर्कमध्येे ‘न्यूक्लिअर नॉनप्रोलाईफेरेशन टीि’च्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला सुरुवात करतानाच संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांनी आण्विक विनाशाबाबत इशारा देऊन अण्वस्त्रांच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली. गेल्या वर्षी स्वीडिश अभ्यासगट ‘सिप्री’ने जाहीर केलेल्या अहवालात, जगभरातील नऊ अण्वस्त्रसज्ज देशांकडून तैनात करण्यात आलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक व महासचिवांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

पृथ्वीवरील अण्वस्त्रांची संख्या कमी करण्यासाठी अण्वस्त्रप्रसारबंदी कराराची आखणी करण्यात आली होती. मात्र या करारावर जगातील सर्व देशांनी अजूनही स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. स्वाक्षऱ्या न करणाऱ्या देशांनी त्यात विविध बदल सुचविले आहेत. या बदलांसाठी सात वर्षांपूर्वी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यातही कराराबाबत एकमत होण्यात अपयश आले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या पुढाकाराने नवी परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषदे महिनाभर चालू राहणार असून अण्वस्त्रप्रसारबंदी कायद्यातील विविध मुद्यांवर व्यापक चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आण्विकसोमवारी संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांच्या भाषणातून परिषदेची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी जगातील वाढत्या आण्विक धोक्यांची जाणीव करून दिली. ‘शीतयुद्धानंतर पहिल्यांदाचा अण्वस्त्रांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. भूराजकीय उद्देशांनी विकसित करण्यात येणारी अण्वस्त्रे नवनवी उंची गाठत आहेत. सध्याच्या घडीला जगात जवळपास 13 हजार अण्वस्त्रे आहेत. जगातील विविध देश अण्वस्त्रांसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करीत आहेत. पण यातून मिळणारी सुरक्षेची हमी फसवी आहे. अण्वस्त्रांच्या प्रसाराचा धोका वाढतो आहे व हा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक घटक कमकुवत होत आहेत’, असा इशारा गुतेरस यांनी दिला. त्याचवेळी आखात, कोरियन क्षेत्र आणि युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षांमध्ये अण्वस्त्रांचा वापर होण्याची संकटही घोंगावत आहे, याकडेही महासचिवांनी लक्ष वेधले.

या वर्षाच्या सुरुवातीलाच सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्य देशांनी अणुयुद्ध रोखणे व अण्वस्त्रांचा प्रसार थांबविण्याबाबत संयुक्त निवेदन जारी केले होते. ‘अण्वस्त्रांचा वापर अत्यंत दूरगामी परिणाम करु शकतो. त्यामुळे त्यांचा वापर बचावात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीच करायला हवा. ही समस्या चिघळण्यापासून रोखणेे व युद्ध टाळणे हे त्याचे उद्देश असायला हवेत. अण्वस्त्रांच्या संख्येत पडणारी भर थांबवायला हवी’, असे या निवेदनात सांगण्यात आले होते.

leave a reply