भूमध्य समुद्रातील इंधनवायू क्षेत्रावरुन हिजबुल्लाहच्या प्रमुखाची इस्रायलला युद्धाची धमकी

भूमध्य समुद्रातीलबैरूत – भूमध्य समुद्रातील ‘कारिश’ इंधनवायू क्षेत्रात सुरू असलेल्या उत्खननावरुन हिजबुल्लाहने इस्रायलला नवी धमकी दिली. इस्रायलची शहरे आपल्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असल्याचे दाखवणारा व्हिडिओ हिजबुल्लाहने प्रसिद्ध केला. तसेच इस्रायल विनाकारण वेळ वाया दवडत असून या देशाने आता युद्धासाठी तयार रहावे, अशी धमकी देणारा हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, कारिश क्षेत्राबाबत इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये चर्चा सुरू असताना, हिजबुल्लाहने यात नाक खुपसू नये, असे इस्रायलने फटकारले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलने भूमध्य समुद्र तसेच दक्षिण इस्रायलजवळच्या इंधनवायूच्या उत्खननासाठी हालचाली वाढविल्या आहेत. यापैकी भूमध्य समुद्रातील कारिश क्षेत्रात इंधनवायूचा मोठा साठा असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 30 कोटी बॅरल्सहून अधिक इंधनवायूचा साठा असल्याचा दावा इस्रायल करीत आहे. भूमध्य समुद्रातील अन्य क्षेत्रांप्रमाणे इस्रायलने कारिश येथेही इंधनवायूचे उत्खनन सुरू करण्याचे जाहीर केले होते. यासाठी इस्रायलने ब्रिटीश कंपनीला कंत्राट दिले व गेल्या महिन्यात सदर जहाज कारिशच्या क्षेत्रात दाखल झाले होते.

राजकीय अस्थैर्यामुळे याआधीच आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या लेबेनॉनने कारिशमधील इस्रायलच्या उत्खननाला विरोध केला. सदर क्षेत्र हे लेबेनॉनच्या सागरी हद्दीत येत असल्याचा दावा लेबेनॉनच्या सरकारने केला. त्यापाठोपाठ लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने देखील कारिश क्षेत्रावर लेबेनॉनचा हक्क असून इथे इस्रायली जहाजांची उपस्थिती खपवून घेणार नसल्याचे हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने बजावले.

त्यानंतर गेल्या महिन्याभरात हिजबुल्लाहने कारिश क्षेत्रात हल्लेखोर ड्रोन, स्फोटकांनी भरलेले जहाज रवाना करून घातपात घडविण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर हिजबुल्लाह कारिशवर हक्क सांगण्यासाठी इस्रायली किंवा ब्रिटीश जहाजांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात हिजबुल्लाहने इस्रायलच्या कारिश तसेच अतिदूर क्षेत्रातील संवेदनशील ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. याकडे इस्रायलचे लष्करी विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

भूमध्य समुद्रातील ‘कारिश’ इंधनवायू क्षेत्रातील उत्खननाच्या मुद्यावरुन इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये चर्चा सुरू आहे. याप्रकरणी अमेरिका मध्यस्थी करीत असून अमेरिकेच्या विशेषदूतांनी यांनी नुकतीच लेबेनॉन व इस्रायलला भेट दिली. याद्वारे इस्रायल आणि लेबेनॉनमधील वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अमेरिकेने म्हटले आहे. तर इस्रायल देखील लेबेनॉनच्या सरकारबरोबर वाटाघाटींसाठी तयार आहे. मात्र याप्रकरणी हिजबुल्लाहने नाक खुपसू नये, असे इस्रायलने बजावले आहे. हिजबुल्लाहच्या हस्तक्षेपामुळे कारिशचा वाद चिघळू शकतो, असा इशारा इस्रायली माध्यमे सूत्रांच्या हवाल्याने देत आहेत.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीमेजवळ शस्त्रास्त्रांची जमवाजमव वाढविल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर इस्रायलने देखील लेबेनॉन सीमेजवळ हवाई सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

leave a reply