हंगेरी सर्बियाला रशियन इंधनाची पाईपलाईन उभारुन देणार

बुडापेस्ट – युरोपिय महासंघाने लादलेल्या निर्बंधांची पर्वा न करता हंगेरीने सर्बियाला रशियन इंधनाचा पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी हंगेरी सर्बियासाठी रशियन इंधनाची पाईपलाईन उभारणार असल्याची घोषणा हंगेरीने केली. महासंघाने सर्बियाला इंधनपुरवठा करणाऱ्या क्रोएशियातील पाईपलाईनवर निर्बंध लादल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे हंगेरीने म्हटले आहे. दरम्यान, रशियाचा सहकारी देश असलेल्या हंगेरीचा हा निर्णय युरोपिय महासंघाला आव्हान देणारा असल्याचा दावा केला जातो.

सर्बियाला सर्वाधिक इंधनाचा पुरवठा क्रोएशिया आणि ॲड्रियाटिक समुद्रामार्गे होतो. पण गेल्या काही महिन्यांपासून युरोपिय महासंघाने रशियाशी संबंधित व्यक्ती, प्रकल्पांवर उत्तरोत्तर निर्बंधांची कारवाई केली आहे. यामध्ये क्रोएशियातून सर्बियात दाखल होणाऱ्या रशियाच्या इंधनपाईपलाईनचा समावेश आहे. सध्या सर्बियाकडे किमान दोन महिने पुरेल इतकाच इंधनाचा साठा आहे. यामुळे इतर युरोपिय देशांप्रमाणे सर्बियातही इंधनाचे संकट निर्माण झाले आहे.

पण युक्रेनमार्गे हंगेरीत दाखल होणारी ड्रूझ्बा किंवा फ्रेंडशिप पाईपलाईन महासंघाने या निर्बंधातून वगळली आहे. हंगेरीसह स्लोव्हाकिया आणि झेक प्रजासत्ताक या देशांनाही सदर पाईपलाईनमार्गे इंधनाचा पुरवठा मिळत आहे. त्यामुळे हंगेरी, स्लोव्हाकिया या देशांमध्ये अद्याप युरोपिय देशांप्रमाणे इंधनाचे संकट निर्माण झालेले नाही. हंगेरीकडे किमान पाच ते सहा महिने पुरतील, इतका नैसर्गिक इंधनवायूचा साठा असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ऑर्बन यांनी याआधीच केली होती.

अशा परिस्थितीत, हंगेरीने सर्बियासाठी रशियन इंधनाचा पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन उभारण्याची घोषणा केली. हंगेरीच्या ऑर्बन सरकारचे प्रवक्ते झोल्टान कोवाच यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. या नव्या पाईपलाईनमुळे सर्बियाला स्वस्त दरातील इंधनाचा पुरवठा मिळेल, असा दावा कोवाच यांनी केला. गेल्याच आठवड्यात हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष ऑर्बन आणि सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुचिक यांची बुडापेस्ट येथे भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये इंधनपाईपलाईनबाबत एकमत झाल्याचा दावा केला जातो.

सर्बिया हा युरोपिय महासंघाचा सदस्य देश बनण्याच्या तयारीत आहे. युक्रेन आणि तुर्कीप्रमाणे सर्बियानेदेखील युरोपिय महासंघाचा सदस्य देश बनण्यासाठी धडपड सुरू केली आहे. गेल्याच वर्षी या प्रक्रियेला वेग मिळाला होता. पण रशिया-युक्रेनच्या संघर्षानंतर युरोपिय महासंघाने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा सर्वाधिक फटका रशियाच्या इंधनावर अवलंबून असलेल्या सर्बियासारख्या देशांना बसला आहे. त्यातच महासंघाकडून रशियावरील निर्बंध वाढविण्याचे इशारे दिले जात आहेत. त्यामुळे युरोपमधील देशांसमोरील इंधनाचे संकट येत्या काळात कमी होणार नसल्याची भीती व्यक्त केली जाते. अशावेळी युरोपिय महासंघाच्या निर्बंधांची पर्वा न करता हंगेरी सर्बियाला रशियन इंधनाचा पुरवठा करणारी पाईपलाईन उभारून देत आहे. हंगेरी-सर्बियातील हे सहकार्य महासंघाला आव्हान देणारे ठरत आहे. यावर महासंघाकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

leave a reply