उच्चभ्रू युद्धखोरांच्या गटाचे अमेरिकेच्या सत्ताधारी पक्षावर नियंत्रण

- अमेरिकन काँग्रेसच्या माजी सदस्या तुलसी गबार्ड यांचे घणाघाती आरोप

वॉशिंग्टन – पुढच्या महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीच्या आधी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षाला धक्का बसला आहे. अमेरिकन काँग्रेसच्या माजी सदस्या तुलसी गबार्ड यांनी मंगळवारी डेमोक्रॅट पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. सध्याचा डेमोक्रॅट पक्ष अमेरिकन जनतेच्या बाजूने उभा नसून काही मूठभर युद्धखोर उच्चभ्रूंकडून हा पक्ष कंट्रोल केला जात आहे. या युद्धखोर उच्चभ्रूंनी अमेरिकेला अणुयुद्धाच्या जवळ नेऊन ठेवले आहे, असा घणाघाती आरोप तुलसी गबार्ड यांनी केला. पुढच्या महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीच्या आधी डेमोक्रॅट पक्षातील इतरजणांनी या पक्षातून बाहेर पडावे, असे आवाहन गबार्ड यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या बेताल धोरणांमुळे युक्रेनचे युद्ध पेटल्याची टीका केली होती. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे नेते बायडेन यांच्या धोरणांना सातत्याने लक्ष करीत असून त्यांच्यामुळे अमेरिकेत महागाई भडकल्याचा व बेरोजगारी माजल्याचा आरोप करीत आहेत. बायडेन यांच्या डेमोक्रॅट पक्षाचे नेते देखील त्यांच्यावर नाराज असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र मंगळवारी तुलसी गबार्ड यांनी थेट डेमोक्रॅट पक्षाच्या धोरणांवर हल्ला चढविला आणि या पक्षाच्या अमेरिकन जनतेबरोबरील बांधिलकीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.

सध्याचा डेमोक्रॅट पक्ष हा पोलीस दलाचे खच्चीकरण करणारा, गुन्हेगारांना पाठिशी घालणारा आणि देशाच्या सीमा खुल्या करण्यावर विश्वास असलेला आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या धोरणामुळे अमेरिका अणुयुद्धाच्या जवळ पोहोचली आहे. कारण हा पक्ष अमेरिकन जनतेशी बांधिल राहिलेला नसून काही मूठभर उच्चभ्रू युद्धखोरांकडून भ्याड व दांभिकांमार्फत डेमोक्रॅट पक्ष चालविला जात आहे. प्रत्येक गोष्टीत वंशद्वेष शोधण्याचा सपाटा डेमोक्रॅट पक्षाने लावला असून त्यामागे गौरवर्णियांबाबतचा विद्वेष असल्याची टीका तुलसी गबार्ड यांनी केली. देवाने बहाल केलेल्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न या पक्षाकडून सुरू आहेत. देव आणि अध्यात्मावर आस्था असलेल्यांकडे डेमोक्रॅट पक्ष आपले वैरी म्हणून पाहत आहे, असा ठपका गबार्ड यांनी ठेवला.

जनतेचे व जनतेसाठी असलेल्या सरकारवर आपण विश्वास ठेवू शकतो. पण सध्याचा डेमोक्रॅट पक्ष तसा राहिलेला नाही. हा पक्ष मूठभर उच्चभ्रूंसाठीच सरकार चालवित आहे आणि मी अशा पक्षात राहू शकत नाही, असे सांगून गबार्ड यांनी आपण डेमोक्रॅट पार्टीपासून फारकत घेतल्याचे जाहीर केले. डेमोक्रॅट पक्षातील जे कुणी माझ्याशी सहमत असतील, ज्यांना ही डेमोक्रॅट पक्षाची दांभिक विचारसरणी मान्य नसेल, त्यांनी त्यांनी पुढच्या महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीच्या आधी या पक्षातून बाहेर पडावे, असे आवाहन देखील तुलसी गबार्ड यांनी केले आहे.

डेमोक्रॅट पार्टीतून बाहेर पडल्यानंतर गबाड विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीमध्ये सहभागी होणार की वेगळा पक्ष उभारणार, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र घणाघाती टीका करून डेमोक्रॅट पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन तुलसी गबार्ड यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाला धक्का दिल्याचे दिसत आहे. बायडेन यांची धोरणे व कार्यशैलीवर नाराज असलेल्या डेमोक्रॅट पक्षातील इतर काहीजण गबार्ड यांना साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य म्हणजे मध्यावधी निवडणुकीत बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांचा फटका डेमोक्रॅट पक्षाला बसेल अशी दाट शक्यता वर्तविली जात असतानाच, गबार्ड यांनी घेतलेला हा निर्णय बायडेन यांच्या प्रशासनाला फार मोठी किंमत चुकती करण्यास भाग पाडू शकतो.

leave a reply