अमेरिका आणि इस्रायलमध्ये हुश-हुश डिप्लोमसी सुरू होणार

रोम – इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्द्यावरुन अमेरिका आणि इस्रायलमध्ये असलेले मतभेद दूर करण्यासाठी दोन्ही देशांनी नवे राजनैतिक सहकार्य प्रस्थापित करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी अमेरिका आणि इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांची विशेष बैठक इटलीच्या रोममध्ये पार पडेल. यावेळी ‘हुश-हुश डिप्लोमसी’ अर्थात गोपनीय पातळीवरील राजनैतिक चर्चा होईल. अणुकराराच्या मुद्यावर इराणला एकटे पाडण्यासंबंधी या बैठकीत चर्चा होणार असल्याचा दावा केला जातो. चोवीस तासांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुकराराच्या मुद्यावर इराणला बजावून यासंबंधीचे संकेत दिले आहेत.

अमेरिका आणि इस्रायलमध्ये हुश-हुश डिप्लोमसी सुरू होणारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर सुरू केलेल्या अणुकरारावर इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू नाखूश होते. या वाटाघाटीने इराणचा अणुकार्यक्रम थांबणार नसल्याचा दावा नेत्यान्याहू यांनी केला होता. त्याचबरोबर इराणला अणुबाम्बची निर्मिती करू देणार नाही, मग यासाठी अमेरिकेने साथ दिली नाही तरी चालेल, असे इस्रायलच्या माजी पंतप्रधानांनी जाहीर केले होते. यामुळे बायडेन प्रशासन आणि इस्रायलमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. पण दोन आठवड्यांपूर्वी इस्रायलच्या सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली.

इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्यावर अमेरिका आणि इस्रायलमध्ये चर्चेचे नवे पर्व सुरू होऊ शकते, असे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एयर लैपीड यांचा इटली दौरा देखील अमेरिकेबरोबरच्या या नव्या सहकार्यावर आधारीत असल्याचे बोलले जाते. इटलीची राजधानी रोम येथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन आणि इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लैपीड यांच्यात इराण आणि गाझापट्टीच्या मुद्यावर महत्त्वाची बैठक होणार आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील ही बैठक हुश-हुश डिप्लोमसी वर आधारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. या चर्चेत फार मोठे ध्येय समोर न ठेवता छोटी उद्दिष्टे गाठण्यावर चर्चा होणार असल्याचे बोलले जाते. इस्रायल आणि पलेस्टाईनमधील रखडलेली शांतीचर्चा पुन्हा सुरू करण्यावरही या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जाते. त्याचबरोबर हमासबरोबरच्या संघर्षात महत्त्वाची कामगिरी बजावणार्या आयर्न डोमसाठी अमेरिका आर्थिक सहाय्याची घोषणा करू शकेल.

काही तासांपूर्वी फ्रान्सच्या दौर्‍यावर असताना अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अणुकरारामध्ये सामील होण्यासाठी इराणच्या हातात फार कमी वेळ असल्याचे बजावले होते. इराणला इशारा देऊन अमेरिकेने इस्रायलमधील बेनेट-लैपीड सरकारबरोबरच्या सहकार्याचे संकेत दिले होते.

leave a reply