जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांसमोर ‘हायब्रिड’ दहशतवाद्यांना थोपविण्याचे आव्हान

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी आघाडीवर सुरक्षादलांना नव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. हे आव्हान हायब्रिड दहशतवाद्यांचे असून या दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरक्षादलांना अवघड जात आहे. काश्मीर खोर्‍यात हायब्रिड दहशतवाद्यांचे चलन सुरू होण्यामागे पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संघटना आयएसआय असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद घटला असला, तरी ‘हायब्रिड’ दहशतवाद्यांच्या रुपात नवे आव्हान उभे राहिल्याचे सुरक्षा अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. हायब्रिड दहशतवादी म्हणजे असे दहशतवादी ज्यांची दहशतवादी असल्याची कोणतीही नोंद नसते. ते सामान्य जीवन जगत असतात. मात्र दहशतवादी हल्ले करू शकतील, इतके ते कट्टरपंथी बनलेले असतात. असे हल्ले करून ते पुन्हा सामान्य जीवनात परतात. कोणत्याही दहशतवादी संघटनेशी जोडलेले नसलेले, अप्रशिक्षित मात्र दहशतवादी हल्ले करण्यासाठी प्रेरीत करताच हल्ला करू शकणार्‍यांना ‘हायब्रिड’ दहशतवादी म्हटले जात आहे. थोडक्यात दहशतवादी कारवाया करण्यासाठी कट्टरपंथीयांनी तयार केलेले युवक, मात्र त्यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे, असे या हायब्रिड दहशतवाद्यांबद्दल म्हटले जाऊ शकते, असे अधिकार्‍यांनी अधोरेखित केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांसमोर ‘हायब्रिड’ दहशतवाद्यांना थोपविण्याचे आव्हानअसे दहशतवादी त्यांच्या हस्तकांकडून सूचना मिळताच दहशतवादी हल्ले करतात आणि पुन्हा पुढील आदेश येईपर्यंत सामान्य जीवन जगत राहतात. काश्मीर खोर्‍यात गेल्या काही आठवड्यात सहज लक्ष ठरतील, अशा ठिकाणी दहशतवादी हल्ल्यात वाढ दिसून आली आहे. यातील बहुतांश हल्ले हे पिस्तूलच्या सहाय्याने झाले आहेत. अशा दहशतवाद्यांची कुठेही दहशतवादी म्हणून नोंद नसल्याने त्याचा माग काढणे अवघड होते, अशी माहिती सुरक्षादलाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. ‘हायब्रिड’ दहशतवाद्यांचे हे चलन काश्मीर खोर्‍यात सुरू होण्यामागे पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संघटना आयएसआय असल्याचेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानची हताशा यातून समोर येते. त्यामुळेच आता खोर्‍यात दहशतवादासाठी ही नवी कार्यपद्धती पाकिस्तान अवलंबत आहे. निशस्त्र लहान व्यापारी, व्यवसायिक, समाजसेवक, कार्यकर्ते, राजकीय नेत, तसेच कोणत्याही संरक्षणशिवाय वावरणारे पोलीस अशांना लक्ष केले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील व्यवसायिक आणि सामजिक हालचलींना रोखणे, हा या हल्ल्यांमागील उद्देश आहेत. तसेच फुटीरांविरोधात बोलणार्‍यांना फुटीरतावादाला व दहशतवादाला चिथावणी देणार्‍यांवर टीका करणार्‍यांचे आवाज यापद्धतीने गप्प केले जात असल्याचेही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘हायब्रिड’ दहशतवाद्यांचे लक्ष कोणताही विचार न करता केलेले नसते, तर योजनाबद्धरित्या कट आखून हे हल्ले घडविले जात असल्याकडे अधिकारी लक्ष वेधत आहेत.

17 जून ला सैदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला लक्ष केले होते, 22 जूूनला कानिपोरा नौगाममध्ये एका सीआयडी अधिकार्‍याची हत्या करण्यात आली. 23 जून रोजी श्रीनगरच्या हाब्बाकाडला येथे एका 25 वर्षीय दुकानदाराला दहशतवाद्यांनी गोळी मारून ठार केले. तर 27 जून रोजी पुलवामामध्ये एका विशेष पोलीस अधिकार्‍याला त्याच्या पत्नी व मुलीसह दहशतवाद्यांनी मध्यरात्री हल्ला करून ठार मारले. या अलिकडील काही घटनांकडे अधिकार्‍यांनी लक्ष वेधले आहे.

दहशतवाद्यांचे हे मॉड्यूल लवकरच सुरक्षादल उद्ध्वस्त करतील. दहशतवादी कारवायांमध्ये पूर्णवेळ गुंतललेल्यांचा माग काढता येतो. मात्र अशा पद्धतीने कधीतरी दहशतवादी कारवाया करणार्‍या व इतर वेळी सामान्य जीवन जगणार्‍या स्लीपल सेल किंवा हायब्रिड दहशतवाद्यांचा माग काढणे कठीण असते. कारण त्यांची कुठेही नोंद नसते. पण आम्ही टेहाळणी वाढविली आहे. आम्ही अशा कारवायांवर लक्ष ठेवून आहोत. लवकरच या दहशतवाद्यांना पकडू असा विश्‍वास एका अधिकार्‍याने व्यक्त केला.

जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन वापरावर निर्बंध

हवाईतळावर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने ड्रोन वापरावर निर्बंध आणले आहे. सरकारी कामांव्यतिरिक्त इतरांकडे असलेल्या ड्रान संदर्भात हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्न व इतर समारंभासह कित्येक खाजगी कार्यक्रमात चित्रिकरणासाठी ड्रोन वापरले जातात. तसेच काही खाजगी ड्रोन विकत घेतलेले आहेत. त्या सर्वांना आता ड्रोनचा परनवागी शिवाय वापर करता येणार नाही.

ज्यांच्याकडे ड्रोन आहेत, त्यांनी याबाबतची माहिती प्रशासनला कळवायची आहे. तसेच लष्करी तळ, विमानतळ व सचिवालयांपासून दोन ते तीन किलोमीटरच्या क्षेत्रात कोणालाही ड्रोन उडविण्याची परवानगी नसेल. तसेच लग्न समारंभासाठी वगैरे वापरण्यात येणार्‍या ड्रोन वापरण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागेल. यानंतर एक ओळख नंबर जारी करून ही परवानगी देण्यात येईल आणि या ड्रोन वापराची पूर्ण नोंद ठेवली जाणार आहे.

leave a reply