पाकिस्तान व चीनच्या सीमेवर ‘आयबीजी’ तैनात करणार – भारतीय लष्करप्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली – पाकिस्तानी हवाई दलाची ‘एफ-१६’ व ‘जेएफ १७’ लढाऊ विमाने भारताच्या हवाईहद्दीजवळ गस्त घालत आहेत. तर भारताच्या सिक्कीममध्ये चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. या दोन्ही गोष्टी म्हणजे योगायोग नसून पाकिस्तान आणि चीनच्या भारतविरोधी रणनीतीचा हा भाग असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारताने गिलगिट बाल्टिस्तानसह पीओके पाकिस्तानच्या ताब्यातून घेण्याची तयारी सुरू केल्याने दोन्ही देशांनी भारताच्या सीमेवरील ह्या हालचाली सुरू केल्या आहेत. याकडे सामरिक विश्लेषक लक्ष वेधत आहेत. मात्र भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स’ (आयबीजी) तैनात करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे सांगून या दोन्ही शेजारी देशांना कडक संदेश दिला आहे.

बदलत्या काळातील युद्धतंत्रानुसार भारतीय लष्कराने ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स’ विकसित केले आहेत. या एका आयबीजी मध्ये सुमारे पाच हजार जवानांचा समावेश असतो. यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा, रणगाडे, हवाई सुरक्षा यंत्रणा तसेच संरक्षण साहित्य व इतर आवश्यक गोष्टींच्या वाहतुकीची स्वतंत्र व्यवस्थाही आयबीजी मध्ये केलेली असते. याची निर्णय प्रक्रिया देखील लष्कराच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा खूपच वेगळी असल्याचे सांगितले जाते. आत्ताच्या काळातील युद्धाचे बदलते स्वरूप पाहता अशा आयबीजीची आवश्यकता असल्याचा दावा फार आधीपासून केला जात होता. विशेषतः पाकिस्तान व चीन सारख्या देशाकडून भारताला मिळत असलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आयबीजी विकसित करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या हवाईदलाची विमाने भारताच्या हवाई हद्दीनजीक गस्त घालत असल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. तर सिक्कीमच्या सीमेवर भारतीय सैनिकांची इथे घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनच्या जवानांबरोबर झटापट झाल्याची ही बातमी रविवारी प्रसिद्ध झाली होती. यामध्ये दोन्ही देशांचे जवान जखमी झाले आहेत. या दोन्ही कारवायांद्वारे पाकिस्तान आणि चीन भारताला धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. गिलगिट बाल्टिस्तान व पीओके याबाबत भारताने स्वीकारलेली आक्रमक भूमिका याला कारणीभूत असल्याचा दावा विश्लेषकांकडून केला जातो. चीन व पाकिस्तान मधील सीपीईसी प्रकल्प गिलगिट बाल्टिस्तान मधूनच जातो. त्यामुळे भारताची यासंदर्भातील भूमिका चीनला कमालीची अस्वस्थ करणारी ठरली आहे. म्हणूनच चीनने सिक्कीमच्या सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून भारतावरील दडपण वाढविण्याची तयारी केली होती. मात्र भारतीय सैनिकांनी चीनच्या घुसखोरीला दिलेले प्रत्युत्तर चीनचा मुखभंग करणारे ठरले आहे. याला एक दिवस उलटत नाही तोच भारताच्या लष्करप्रमुखांनी एकाच वेळी पाकिस्तान व चीनला खणखणीत इशारा दिल्याचे दिसत आहे. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर भारतीय लष्कर आयबीजी कधीही तैनात करू शकेल याची पूर्णपणे तयारी झालेली आहे, असे लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी वृत्तसंस्थाना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. कोरोनाव्हायरसची साथ आल्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे, असे लष्कर प्रमुख पुढे म्हणाले.

गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचा ‘हिमविजय’ सराव पार पडला होता. या सरावात आयबीजीने आपले सामर्थ्य प्रदर्शित केले होते. त्यामुळे भारतीय लष्करप्रमुखांनी आयबीजीच्या तैनातीबाबत दिलेल्या इशार्‍याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

leave a reply