चीनच्या वुहानमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढली

बीजिंग/बाल्टिमोर – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात २,८४,०९६ जणांचा बळी गेला असून गेल्या चोवीस तासात मृत्यूमुखी पडलेल्या चार हजार जणांचा यामध्ये समावेश आहे. तर रविवारी जगभरात ८० हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि १५ लाखांहून अधिक रुग्ण उपाचारांती बरे झाले आहेत. तर चीनच्या वुहान शहरासह इतर प्रांतातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याची माहिती समोर येत असून चीनने याआधी या साथीबाबत केलेले सर्व दावे यामुळे खोटे ठरल्याचे दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात अमेरिकेत ७७६ जणांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्याभरात पहिल्यांदाच अमेरिकेतील एका दिवसातील बळींची संख्या हजाराच्या खाली आली आहे. अमेरिकेत या साथीने आतापर्यंत ८०,७८२ जणांचा बळी घेतला आहे. युरोपात रविवारी या साथीने ९५० हून अधिक जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये २६९, इटलीत १६५, स्पेनमध्ये १४३ तर जर्मनीत ७० जणांचा बळी गेला आहे.

जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझिलमध्ये रविवारी या साथीने ४९६ जण दगावले असून या देशातील बळींची एकूण संख्या ११,१२३ वर गेली आहे. रशियामध्ये या साथीने गेल्या चोवीस तासात ९४ जणांचे बळी गेले असून या देशातील एकूण बळींची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. तर रशियात रविवारी या साथीचे ११,५६५ नवे रुग्ण सापडले असून रशियातील कोरोनाग्रस्तांची संख्या सव्वा दोन लाखांच्या जवळ पोहोचली आहे.

सारे जग कोरोनाशी लढत असताना चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून गेल्या चोवीस तासात चीनच्या वेगवेगळ्या भागात किमान ३० हून अधिक रुग्ण सापडल्याची माहिती समोर येत आहे. या साथीचे उगमस्थान ठरलेल्या चीनच्या वुहान शहरात सोमवारी १७ रुग्णांची नोंद झाली. गेल्या दहा दिवसात वुहानमध्ये कोरोनाचे दहाहून अधिक रुग्ण सापडले असून चीनच्या ‘नॅशनल हेल्थ कमिशन’चे प्रवक्ते ‘मी फेंग’ यांनी वुहानच्या जनतेला सावध राहण्याची सूचना केली आहे.

तर चीनच्या इशान्येकडील शुलान शहरात कोरोनाच्या साथीचे १३ रुग्ण असल्याची माहिती चीनच्या माध्यामाने दिली. या रुग्णांच्या संपर्कात असलेले किमान २९० जण देखील वैद्यकीय देखरेखेखाली आहेत. यामुळे शुलान शहराच्या यंत्रणेने लॉकडाउन जाहीर केला आहे. पण हा लॉकडाउन नसून या शहरात ‘मार्शल लॉ’ लागू करण्यात आला असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. शुलानसह चीनच्या इतर भागांमधे मिळून एकूण ७९४ रुग्णांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

leave a reply