वेळीच सुधारणा झाल्या नाही तर इराणमध्ये गृहयुद्ध भडकून रक्तपात होईल

इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

iran-protest-kermanshahतेहरान – इराणच्या राजवटीने निदर्शकांची मागणी मान्य करून देशाच्या व्यवस्थेत सुधारणा घडविल्या नाही. देशातील धार्मिक नेत्यांची राजवट बरखास्त करून संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले नाही तर इराणमध्ये गृहयुद्ध भडकेल आणि रक्तपात होईल, असा इशारा इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खतामी यांनी दिला. तर माजी राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी आणि माजी पंतप्रधान मिर हुसेन मुसावी यांनी आपल्या देशाला सुधारणांची नाही तर सार्वमताची आवश्यकता असल्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इराणची जनताही राजवटीच्या विरोधात असल्याचे युरोपिय देशांमधील सर्वेक्षणातून समोर येत आहे.

Mohammad Khatamiगेले साडेचार महिने इराणमध्ये राजवटीच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. हिजाबसक्तीच्या विरोधापासून सुरू झालेल्या या निदर्शनांमधून आता इराणमधील राजवट बदलीची मागणी होऊ लागली आहे. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या विनाशाच्या घोषणा दिल्या जात आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या कारवाईची पर्वा न करता इराणची जनता रस्त्यावर उतरून निदर्शने करीत असल्याचे व्हिडिओज्‌‍ व फोटोग्राफ्स समोर येत आहेत. यामध्ये इराणमधील सर्वसामान्य जनतेपासून उच्चभ्रू व्यक्तींचाही समावेश आहे.

इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स व संलग्न संघटना या निदर्शकांविरोधात कठोर कारवाई करीत आहेत. काही घटनांमध्ये इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी तरुण निदर्शक महिलांच्या डोळ्यात गोळ्या झाडल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संघटना करीत आहेत. तर सहा वर्षांच्या मुलावरही रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने कारवाई केल्याची बातमी याआधी प्रसिद्ध झाली होती. इराणच्या राजकारणावर प्रभाव असलेली आयातुल्ला खामेनी यांची राजवट आणि रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या या कारवाईविरोधात इराणच्या जनतेतील असंतोष शिगेला पोहोचल्याची जाणीव या देशाचे नेते करून देत आहेत.

Mir-Hossein Mousaviइराणला सुधारणांची गरज असून खामेनी यांच्या राजवटीने निदर्शकांची मागणी मान्य करावी व देशाच्या राजकीय व्यवस्थेत सुधारणा घडवून आणाव्या, असे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सुधारणावादी नेते मोहम्मद खतामी यांनी सुचविले. त्याचबरोबर इराण हा सध्या सर्वप्रकारच्या संकटांचा सामना करीत असून यासाठी इराणच जबाबदार असल्याचे खडेबोल खतामी यांनी सुनावले. यासाठी देशाच्या घटनेत बदल करावे, अन्यथा इराणचे शत्रू या परिस्थितीचा फायदा घेतील, असा दावा खतामी यांनी केला.

आपल्याच देशाच्या जनतेचा शत्रू म्हणून उल्लेख करून इराणची राजवट या अस्थैर्यात भर टाकत आहे. खामेनी यांनी निदर्शकांना शत्रू ठरविल्यामुळे इराणच्या जनतेसाठी अमेरिका, युरोप किंवा इस्रायल शत्रू राहिले नसून खामेनी यांची राजवटच शत्रू बनली आहे, याची जाणीव खतामी यांनी करुन दिली. असेच धोरण कायम ठेवले तर इराणची राजवट कोसळेल. त्यामुळे आपल्या जनतेला स्वातंत्र्य बहाल करा, अन्यथा इराणमध्ये अनागोंदी माजेल, गृहयुद्ध भडकेल आणि भीषण रक्तपात होईल, असा इशारा माजी राष्ट्राध्यक्षांनी दिला. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी, माजी पंतप्रधान मिर हुसेन मुसावी तसेच प्रमुख विरोधी पक्षनेते देशाला सुधारणांची नाही तर सर्वामताची गरज असल्याची मागणी करीत आहेत. मुसावी यांनी इराणमधील राजवट उलथण्याची निदर्शकांची मागणी उचलून धरली आहे. इराणमधील प्रमुख नेत्यांकडून वाढता असलेला हा विरोध खामेनी यांच्या राजवटीसाठी आव्हान ठरत असल्याचे दिसत आहे.

leave a reply