रशियाने निर्यात घटवल्यास कच्च्या तेलाचे दर 380 डॉलर्सपर्यंत भडकतील

- जेपी मॉर्गन चेसच्या विश्लेषकांचा इशारा

कच्च्या तेलाचे दरवॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका तसेच युरोपिय देशांनी रशियन इंधनक्षेत्रावर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांविरोधात कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा रशियन नेतृत्त्वाने वारंवार दिला होता. या पार्श्वभूमीवर, रशियाने कच्च्या तेलाच्या निर्यातीत घट केली तर इंधन बाजारपेठेला मोठा फटका बसून तेलाचे दर तब्बल 380 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत भडकतील, असा इशारा आघाडीची वित्तसंस्था ‘जेपी मॉर्गन चेस’ने दिला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर्स प्रति बॅरल इतके आहेत.

रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. या कालावधीत अमेरिका व युरोपिय देशांनी रशियन अर्थव्यवस्थेसह इतर अनेक क्षेत्रांना लक्ष्य करणारे जबर निर्बंध लादले आहेत. यात रशियन अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या इंधनक्षेत्राचाही समावेश आहे. युरोपातील काही देशांनी रशियातून होणारी इंधनवायूची आयात बंद केली आहे. तर युरोपिय महासंघाने येत्या वर्षभरात रशियातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाची आयात जवळपास 80 टक्क्यांनी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रशियन इंधनावर पूर्ण बंदी घालणे युरोपिय देशांना अजूनही शक्य झालेले नाही.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रशियाने युरोपातील काही देशांचा इंधनवायू पुरवठा खंडित केला आहे. गेल्या महिन्यात जर्मनीसह आघाडीच्या देशांना करण्यात येणाऱ्या नैसर्गिक इंधनवायूच्या पुरवठ्यात घटही करण्यात आली आहे. रशियाच्या या कारवाईने युरोपिय देशांचे धाबे दणाणले असून काही देशांमध्ये इंधन तसेच विजेचे रेशनिंगही सुरू झाले आहे. जर्मनीसारख्या देशांनी महाग झालेल्या इंधनासाठी सबसिडी देण्याचा मार्गही अवलंबिला आहे. तसेच जनतेने इंधनाचा व ऊर्जेचा वापर कमी करावा, असे आवाहनही केले.

कच्च्या तेलाचे दरइंधनवायूनंतर रशिया कच्च्या तेलाच्या बाबतीतही असाच निर्णय घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था असणाऱ्या ‘जेपी मॉर्गन चेस’ने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. ‘नजिकच्या काळात रशिया कच्च्या तेलाच्या व्यवहारांमध्ये सहभाग घेण्याचे टाळण्याचा तसेच निर्यात कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कच्च्या तेलाच्या दरांसाठी हा सर्वात मोठा धोका ठरतो. पाश्चिमात्य देशांना धक्का देण्यासाठी रशिया हे पाऊल उचलू शकते. सध्या कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत असलेली स्थिती रशियाच्या बाजूने आहे’, असे जेपी मॉर्गन चेसच्या विश्लेषकांनी बजावले.

काही दिवसांपूर्वीच ‘जी7′ गटाने रशियन तेलाच्या दरांवर नियंत्रण आणण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर रशिया निर्यात घटविण्याचा निर्णय घेऊ शकेल, असे जेपी मॉर्गन चेसच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. रशियन अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेता रशिया प्रतिदिन 50 लाख बॅरल्सने आपले उत्पादन घटवू शकतो, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले. यापूर्वी एप्रिल महिन्यात रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे 300 डॉलर्सपर्यंत भडकू शकतात, असा इशारा दिला होता.

leave a reply