अमेरिकेने आखातातील सैन्यात कपात केल्यास इथला चीनचा प्रभाव वाढेल

- अमेरिकेच्या सेंटकॉम प्रमुखांचा इशारा

रियाध – ‘अमेरिकेला आव्हान देणार्‍या चीन आणि रशियावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आखातातील सैन्यकपातीचे संकेत दिले खरे. पण अमेरिकेने आखातात सैन्यकपात केली, तर हाच चीन आखातातील अमेरिकेची जागा घेऊन इथे आपला प्रभाव वाढविल’, असा इशारा अमेरिकेच्या सेंट्रल कमांड-सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी दिला. सौदी अरेबियाच्या लष्करी अधिकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना जनरल मॅकेन्झी यांनी हा इशारा दिला.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या तीन महिन्यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या काही निर्णयांवर अमेरिकेचे लष्करी अधिकारी सहमत नसल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानातून पूर्ण सैन्यमाघारीच्या निर्णयानंतर बायडेन यांनी इराक, सिरिया तसेच आखातातील इतर देशांमधील सैन्यसंख्याही कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर बायडेन प्रशासनाने युएई व सौदी अरेबियाला देण्यात येणारे लष्करी सहाय्य देखील रोखले. तसेच येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकण्याचा निर्णय मागे घेतला होता.

अमेरिकेने आखातातील सैन्यात कपात केल्यास इथला चीनचा प्रभाव वाढेल - अमेरिकेच्या सेंटकॉम प्रमुखांचा इशारायाशिवाय आखातात तैनात असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौका माघारी घेण्यावर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन विचार करीत आहेत. तर दुसरीकडे बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकरारावर वाटाघाटी सुरू करून इराणवरील निर्बंध मागे घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इराण आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचा आखाती देशांना धोका वाढत असताना, अमेरिकेच्या या हालचालींमुळे आखाती देशांमध्ये असुरक्षितता निर्माण होत असल्याचे जनरल मॅकेन्झी यांनी बजावले.

‘अशा परिस्थितीत अमेरिकेने आखाती देशांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता या क्षेत्रात सैन्य कपात केली, तर त्याचा फायदा चीन आणि रशिया घेतील’, असे जनरल मॅकेन्झी यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर रशिया आखाती देशांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवू शकतो. या क्षेत्रात आपला प्रभाव वाढविण्याचे उद्दिष्ट चीनने फार आधीपासून आपल्यासमोर ठेवले होते. अमेरिकेच्या सैन्यकपातीनंतर चीन आखातात आपले लष्करी तळ प्रस्थापित करील’, याची जाणीव सेंटकॉमच्या प्रमुखांनी करून दिली.

‘अमेरिकेला आव्हान देणार्‍या चीनला वेळीच इशारा देणे आवश्यक आहे. पण जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने चीनविरोधात पाऊल उचलताना दुसर्‍या ठिकाणी आपण चीनसाठी संधी तर निर्माण करून देत नाही ना, याची खातरजमा करायला हवी’, अशा शब्दात जनरल मॅकेन्झी यांनी बायडेन प्रशासनाला समज दिली आहे.

दरम्यान, सिरियातून सैन्यमाघार घेण्याच्या बायडेन प्रशासनाच्या हालचालींवर इस्रायल देखील नाराज आहे. ‘सिरियातील अमेरिकेच्या माघारीचा फायदा घेऊन चीन सिरियामध्ये आपले लष्करी प्रभाव वाढविल व त्यानंतर आखातात आपले पाय पसरेल. अमेरिकेला याची जाणीव आहे, तरीही चीनला रोखण्यासाठी अमेरिकेने विशेष पावले उचललेली नाहीत’, असे इस्रायली सूत्रांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनच्या विरोधात कठोर पावले न उचलता या देशाला सामरिक व धोरणात्मक लाभ मिळेल, असेच निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेत केला जात आहे. इस्रायलच्या सूत्रांनी देखील नेमक्या शब्दात ही बाब अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

leave a reply