भारताच्या आत्मनिर्भर कार्यक्रमाची ‘आयएमएफ’कडून प्रशंसा

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. या कार्यक्रमामुळे भारताचा सातत्याने आर्थिक विकास होईल, असा विश्वास ‘आयएमएफ’ने व्यक्त केला. मात्र यासाठी मुख्य क्षेत्रातील धोरणे आणि सुधारणांकडे विशेष लक्ष पुरवण्याचा सल्लाही ‘आयएमएफ’कडून देण्यात आला आहे.

'आयएमएफ'

कोरोनाच्या संकटाच्या काळात भारत सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. छोटे व्यापारी, दुकानदार, शेतकरी, उद्योजक या सर्वांसाठी निर्णयात तरतुदी करण्यात आल्या. तसेच गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. काही क्षेत्रे परकीय गुंतवणूकदारांसाठी अधिक खुली करण्यात आली. तसेच भारताला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

भारताच्या या आत्मनिर्भर कार्यक्रमाची ‘आयएमएफ’च्या कम्युनिकेशन डिपार्टमेंट संचालक गेरी राईस यांनी प्रशंसा केली आहे. या आर्थिक पॅकेज आणि आत्मनिर्भर कार्यक्रमाने भारतीय अर्थव्यवस्थेवरील मोठे धोके कमी केले आहेत. म्हणूनच भारत सरकारचे हे पाऊल खूपच महत्वपूर्ण होते, असे राईस यांनी म्हटले आहे.

भारताचा हा कार्यक्रम ‘मेक फॉर वर्ल्ड’साठी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका पार पडायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, याची आठवण राईस यांनी करून दिली. मात्र हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता भारताला जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्यास सहाय्यभूत होतील अशा धोरणांना प्राथमिकता द्यावी लागेल. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल, असे राईस म्हणाले.

भारताला आपल्या आरोग्य सुविधा क्षेत्राकडे लक्ष पुरवावे लागेल. यावरील खर्च वाढवावा लागेल. याशिवाय रचनात्मक सुधारणांवर भर द्यावा लागेल. पायाभूत सुविधा, उत्पादन बाजार आणि कामगार विषयक सुधारणांवर, काम करावे लागेल, याकडे राईस यांनी लक्ष वेधले.

leave a reply