भारताच्या इंधनक्षेत्रात गुंतवणुकीसाठी अमेरिकन कंपन्यांना आमंत्रण

नवी दिल्ली – भारताने नैसर्गिक वायूक्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकसित करण्यासाठी अमेरिकन कंपन्यांना आमंत्रित केले आहे. गुरुवारी ‘स्ट्रॅटेजिक एनर्जी पार्टनरशिप’वर अमेरिका आणि भारतामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा पार पडली. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमेरिकन कंपन्यांना हे आमंत्रण दिले.यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत केनिथ जस्टरही सहभागी झाले होते.

अमेरिकन कंपन्यांना आमंत्रण

भारत अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीमध्ये उर्जा क्षेत्र महत्त्वाचा घटक असल्याचे अमेरिकेचे राजदूत जस्टर म्हणाले. तसेच यावेळी उभय देशांमध्ये नैसर्गिक गॅस क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले. जून महिन्यात भारत आणि अमेरिकेमध्ये ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’वर चर्चा पार पडली होती. याचा आढावा या व्हर्च्युअल बैठकीत घेण्यात आला.

फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान अमेरिकेतून भारताला नैसर्गिक वायूची निर्यात करण्यासंदर्भात करार पार पडला होता. त्यासाठी भारतात गॅस पाईपलाईनचे जाळे उभारण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच भारत अमेरिकेकडून इंधनाची आयात वाढविणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकन कंपन्यांना केलेले हे आवाहन महत्वाचे ठरते. यामुळे भारत आणि अमेरिकेतील इंधन क्षेत्रातील सहकार्य वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.

leave a reply