आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्जसहाय्य नाकारले

कर्जसहाय्यइस्लामाबाद – इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविण्याची आधी स्वीकारलेली अट मानल्याखेरीज पाकिस्तानला नवे कर्ज मिळणार नाही, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केले. यानंतर खचलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देशाला वाचविण्यासाठी आपले सरकार हा निर्णय घेईल, असे संकेत दिले आहेत. देशासाठी आपले राजकीय भवितव्य पणाला लावण्याची तयारी दाखवून पंतप्रधान शाहबाज शरीफ हे ‘राजकीय बलिदान’ देण्याचा दावा करी आहेत. पण प्रत्यक्षात पाकिस्तानच्या सरकारसमोर नाणेनिधीच्या शर्ती मानण्याखेरीज पर्यायच राहिलेला नाही, ही बाब सर्वांनाच कळून चुकलेली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानच्या बऱ्याचशा भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. अजूनही वीजेचा पुरवठा सुरळीत झालेला नसून यासाठी पाकिस्तानच्या सरकारवर घणाघाती टीका होत आहे. पाकिस्तानच्या काही बेताल पत्रकारांनी तर आपल्या देशावर ओढावलेल्या या संकटामागे भारताचे सायबर हल्ले असल्याचे दावे ठोकून दिले. पण चीनने पुरविलेले सुमार दर्जाचे ग्रीड्स याला जबाबदार असल्याची बाब या देशातील जबाबदार विश्लेषक व पत्रकारांनी लक्षात आणून दिली. याबरोबरच पाकिस्तानमध्ये डिझेल व पेट्रोलचा साठा संपुष्टात येत असल्याचे दावे केले जातात. त्यामुळे लवकरच पाकिस्तानात श्रीलंकेसारखी स्थिती होईल, अशी चिंता व्यक्त केली जाते. किंबहुना पाकिस्तानच्या काही भागात तशी परिस्थिती उद्भवली देखील आहे, पण त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही, अशी तक्रार जनता करीत आहे.

वीज व इंधनाच्या तसेच अन्नधान्याच्या टंचाई आणि कडाडलेल्या महागाईचे थैमान पाकिस्तानात सुरू आहे. गव्हाच्या एका पोत्यासाठी पाकिस्तानात हाणामारी सुरू झाली असून चोरीमारी आणि लूटमारीचे प्रकार पाकिस्तानच्या शहरांमध्ये सर्रासपणे घडत आहेत. यामुळे बलोचिस्तान, सिंध प्रांतात स्वातंत्र्याची मागणी जोर पकडू लागली आहे. पुढच्या काळात पाकिस्तानचे चार तुकडे होतील, अशी चिंता माध्यमे उघडपणे व्यक्त करू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान शाहबाज शरीफ नाणेनिधीच्या कर्जसहाय्यासाठी धडपड असून त्यासाठी आपले राजकीय भांडवल पणाला लावण्याचे दावे करीत आहेत. पण त्यांच्या या राजकीय बलिदानाचा पाकिस्तानला फार मोठा लाभ मिळण्याची शक्यता नाही.

leave a reply