युद्धासाठी रशियाकडे पर्याप्त शस्त्रसाठा आहे

- माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह

पर्याप्त शस्त्रसाठामॉस्को – ‘रशियाचे प्रतिस्पर्धी सातत्याने रशियाकडून वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्याकडून वारंवार दावे करण्यात येतात की रशियाकडील शस्त्रसाठा कमी होत चालला आहे किंवा संपला आहे. मात्र मी त्यांचा अपेक्षाभंग घडविणार आहे. रशियाकडे युद्धासाठी पर्याप्त शस्त्रसाठा आहे’, असे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व सिक्युरिटी कौन्सिलचे उपप्रमुख दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी बजावले.

रशिया-युक्रेन संघर्षाला 11 महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. या काळात रशियाने मोठ्या प्रमाणात रणगाडे, रॉकेट्स, ड्रोन्स, लढाऊ विमाने तसेच क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. युक्रेनकडून रशियाचे अनेक रणगाडे व इतर संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचे दावे तसेच फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याचवेळी ब्रिटन व इतर पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांकडून रशियाकडील शस्त्रसामुग्री कमी झाल्याचे, क्षेपणास्त्रांचा साठा संपल्याचे दावे करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या यंत्रणेने रशियाकडे फक्त 550 क्षेपणास्त्रे राहिल्याचेही म्हटले होते.

पर्याप्त शस्त्रसाठा

या पार्श्वभूमीवर, मेदवेदेव्ह यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. मेदवेदेव्ह यांच्याकडे युद्धकाळात रशियन लष्करासाठी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या ‘मिलिटरी-इंडस्ट्रिअल कमिशन’ची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी रशियातील विविध शस्त्रनिर्मिती कारखान्यांना भेटी दिल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे मेदवेदेव्ह यांनी रशियाच्या शस्त्रसाठ्याबाबत वक्तव्य करून युक्रेनसह पाश्चिमात्यांना योग्य इशारा दिल्याचे दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही गेल्या महिन्यात रशियातील काही आघाडीच्या संरक्षण कारखान्यांना भेटी देऊन शस्त्रपुरवठ्याचा दर्जा व पुरवठ्याचा वेग याबाबत विशेष निर्देश दिले होते.

दरम्यान, रशियन लष्कराने झॅपोरिझिआ प्रांतातील युक्रेनचा मोठा हल्ला उधळल्याचा दावा रशियाच्या संरक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. युक्रेनने मेलिटोपोल व बर्डिआन्स्क शहरांवर प्रतिहल्ल्यांची योजना आखली होती. मात्र रशियाने आधीच हल्ले चढवून युक्रेनच्या योजना उधळली असे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात रशियन फौजांनी झॅपोरिझिआमधील दोन महत्त्वाच्या शहरांच्या दिशेने आगेकूच केल्याची माहितीही रशियाकडून देण्यात आली आहे.

रशियाची प्रगत विनाशिका ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ अटलांटिक महासागरात दाखल झाली असून या विनाशिकेने ‘झिरकॉन’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने सराव केल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

leave a reply