अफगाणिस्तानविरोधात छुपे युद्ध छेडणार्‍या पाकिस्तानवर निर्बंध टाका

- कॅनडाच्या माजी मंत्र्याची मागणी

छुपे युद्धओंटारियो/इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना तालिबानचे उघडपणे समर्थन करून अफगाणिस्तानविरोधात छुपे युद्ध छेडणार्‍या पाकिस्तानवर निर्बंध टाका, अशी मागणी कॅनडाचे माजी मंत्री व राजनैतिक अधिकारी ख्रिस अलेक्झांडर यांनी केली. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लबाड, निर्लज्ज, खोटारडे व तालिबानचे समर्थक असल्याचा आरोप केला. यावर पाकिस्तानातून प्रतिक्रिया आली असून कॅनडाच्या सरकारने आपल्या माजी नेत्यावर कारवाई करावी, अशी अजब मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली.

पंधरा वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील राजनैतिक अधिकारी व त्यानंतर कॅनडाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले ख्रिस अलेक्झांडर अफगाणिस्तानातील लोकशाहीचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर या लोकशाहीला हादरे देणारी तालिबान आणि पाकिस्तानचे कडवट विरोधक म्हणून अलेक्झांडर गेली काही वर्षे पाकिस्तानवर टीका करीत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या सोशल मीडियावर अलेक्झांडर यांचे समर्थक असून उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह देखील कॅनडाच्या माजी मंत्र्यांच्या पाकिस्तानविरोधी टीकेला दाद देताना पाहिले जाते.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपला देश तालिबानची प्रवक्तेगिरी करीत नसल्याचे म्हटले होते. तर दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी तालिबान दाईश अर्थात आयएसला अफगाणिस्तानात टिकू देणार नसल्याचे सांगून तालिबानची बाजू घेतली होती. पाकिस्तानच्या या दहशतवादधार्जिण्या धोरणाचा ख्रिस अलेक्झांडर यांनी समाचार घेतला. त्याचबरोबर पंतप्रधानपदावर येण्याआधी इम्रान खान यांनी तालिबानचे उघडपणे समर्थन केले होते, याची आठवण अलेक्झांडर यांनी करुन दिली.

‘अफगाणिस्तानात संघर्षबंदी लागू करून शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेने तालिबानला तात्पुरत्या काळासाठी मान्यता दिली होती. पण अफगाणिस्तानात हल्ले घडवून तालिबानने आपली उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तालिबानला दिलेली मान्यता काढून घ्यावी व अफगाणिस्तानात हे छुपे युद्ध खेळणार्‍या पाकिस्तानातील संबंधितांवर निर्बंध टाकावे’, अशी मागणी ख्रिस अलेक्झांडर यांनी केली.

यासाठी संयुक्त अलेक्झांडर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील वाढत्या हिंसाचारावर व्यक्त केलेल्या चिंतेचा दाखला दिला. दोन दिवसांपूर्वी अलेक्झांडर यांनी चीनवर देखील निशाणा साधला होता. आक्रमक आणि नरसंहार घडविणार्‍या चीनला रोखण्यासाठी पाकिस्तानने तालिबानच्या साथीने अफगाणिस्तानातील सरकारविरोधात सुरू केलेले छुपे युद्ध रोखणे आवश्यक असल्याचे आवाहन अलेक्झांडर यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.

कॅनडाच्या माजी मंत्र्याने केलेल्या निर्बंधांच्या मागणीवर पाकिस्तानातून प्रतिक्रिया आली. पाकिस्तानचे पंतप्रधान व परराष्ट्रमंत्र्यांवर आरोप करणार्‍या अलेक्झांडर यांच्यावर कॅनडाच्या सरकारने कारवाईवर अशी मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. एका माजी अधिकार्‍याच्या वक्तव्यावर पाकिस्तान अस्वस्थ झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जाते.

leave a reply