इम्रान खान यांचे अमेरिका, इस्रायलसह भारतावरही कारस्थानाचे आरोप

इम्रान खानइस्लामाबाद – अमेरिका, इस्रायल आणि भारताने कारस्थान आखून शाहबाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर बसविले, असा आरोप इम्रानखान यांनी केला. आत्तापर्यंत आपले सरकार पाडण्यामागे अमेरिका असल्याचा आरोप इम्रान खान करीत होते. पण आता या कटात इस्रायल व भारताचा समावेश असल्याचा ठपक इम्रानखान यांनी ठेवला आहे. आधीच्या काळात पाकिस्तानच्या लष्करावर थेट दोषारोप करण्याचे टाळणारे इम्रानखान आता उघडपणे पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले चढवू लागल्याचे दिसत आहे.

आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून परकीय शक्ती आपल्या पाकिस्तानातील हस्तकांचा वापर करून आपला काट काढतील, असे दावे इम्रान खान यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पण सध्या ते आपल्या पक्षाचे सरकार असलेल्या खैबर-पख्तूनवाला प्रांतात आहेत. इथल्या सरकारचा वापर करून इम्रान खान यांनी शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर आरोपांचा सपाटाला लावला आहे. पाकिस्तानात आपले सरकार सत्तेवर आले नाही, तर देशाचे तीन तुकडे होतील, अण्वस्त्रे पाकिस्तानकडून काढून घेतली जातील, असे इशारे इम्रानखान यांनी दिले होते.

आता आपले सरकार पाडून शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान करण्याच्या कटात अमेरिकेबरोबर इस्रायल व भारताचाही हात असल्याचे इम्रानखान सांगत आहेत. शाहबाज शरीफ यांच्या सरकारने काहीजणांना इस्रायलमध्ये पाठविले होते, याकडे लक्ष वेधून इम्रानखान यांनी हा कटाचा भाग असल्याचे म्हटले आहे. इस्रायल व भारताचे सहकार्य आहे आणि म्हणूनच भारतानेही या कटाला साथ दिली, असा दावा इम्रानखान करीत आहेत.

प्रत्यक्षात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी करणारी धोरणे राबवून इम्रानखान यांनी भारताला सहाय्य केल्याचे दावे भारतीय विश्लेषक करीत आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानी जनतेला आपल्या देशाच्या लष्कराविरोधात उभे करण्याचे काम भारत कितीही पैसे खर्च करून करू शकला नसता, ती किमया इम्रानखान यांनी करून दाखविली, असा टोला भारतीय विश्लेषकांनी लगावला होता. म्हणूनच इम्रानखान पंतप्रधानपदावर असणे भारतासाठी लाभदायी ठरले आणि त्यांच्या जाण्याने भारताचे नुकसान झाल्याची खोचक प्रतिक्रिया भारतीय विश्लेषक देत आहेत.

अशा परिस्थितीत इम्रानखान यांनी केलेल्या आरोपांना पाकिस्तानातून देखील दुजोरा मिळणे अवघड आहे. किंबहुना इम्रान खान यांच्या हातून सत्ता गेल्यानंतर त्यांचे डोके ताळ्यावर राहिलेले नाही, अशी टीका पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत. आपण पाकिस्तानचे तारणहार आहोत आणि आपल्या नेतृत्त्वाखेरीज पाकिस्तानला पर्याय राहिलेला नाही, असा गैरसमज करून घेतलेल्या इम्रानखान यांच्यापासून देशाला फार मोठा धोका संभवतो. याची दखल घेऊन पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी इम्रानखान यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हे पत्रकार करीत आहेत. मात्र आपल्यावर अशी कारवाई होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतरच इम्रानखान यांनी आपले सरकार असलेल्या खैबर-पख्तूनवाला प्रांतात धाव घेतल्याचे दावे केले जातात.

leave a reply